केंद्रात भाजपला शिवसैनिकांच्या घामातूनच सत्ता मिळाली आहे. त्यामुळेच केंद्रातील मंत्रिपद सोडायला आम्ही वेडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश बघावा, महाराष्ट्रात लुडबुड करू नये. महाराष्ट्र सांभाळायला शिवसेना समर्थ आहे, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मनसेवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.  
उत्तर नगर जिल्ह्णाातील डॉ. उषाताई तनपुरे (राहुरी), साहेबराव घाडगे (नेवासा), जनार्दन आहेर (संगमनेर), मधुकर तळपाडे (अकोले), लहू कानडे (श्रीरामपूर) व अभय शेळके (शिर्डी) या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहाता तालुक्यातील िपपरी निर्मळ येथे झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अशोक काळे, संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आदी या वेळी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मोदींना पंतप्रधानपदी बसविण्यात शिवसेनेचेही मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांना ‘अच्छे दिन’ बघायला मिळाले. खुर्ची मिळाल्यानंतर भाजपने सेनेची २५ वर्षांची युती तोडून पाठीत वार केला. आम्ही केंद्रातील मंत्रिपद सोडायला क्षणाचाही विलंब करणार नाही, परंतु केंद्रात मोदींचे सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी घाम गाळला आहे. त्यामुळे मोदींनी देशाचे बघावे, महाराष्ट्र सांभाळायला शिवसेना समर्थ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची कामे केली असती तर जनता समस्या घेऊन माझ्या सभेला आली नसती. विखे पिता-पुत्र अडगळीत पडलेले होते, शिवसेनेने त्यांना केंद्रात व राज्यात मंत्रिपदे देऊन त्यांची प्रतिष्ठा वाढवली, पण ते शिवसेनेचा घात करून निघून गेले. यापुढे शिर्डीत विखेंची शक्ती नाही तर साईबाबांची भक्ती चालेल, असे ते म्हणाले.
ठाकरेंचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार व गुन्हेगारमुक्त सरकार देऊ असे सांगत स्वच्छ प्रशासन, भयमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देतात, मात्र ते गुरुवारी राहुरी येथे कुणाच्या प्रचारासाठी आले होते, असा प्रश्न ठाकरे यांनी येथील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता उपस्थित केला.