राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला गेल्याने त्यांना शिवसेने विरोधात कंठ फुटत आहे. त्यांना किती तोंड आहेत हे आम्हाला चांगलच माहित आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांचा संप फोडण्याचे काम केल्याचा आरोप केला. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राधाकृष्ण विखे पाटील आणि अजितदादांना पंख फुटायला लागले आहेत, असा हल्ला ठाकरे यांनी जळगाव जिल्हा दौर्‍यातील शेतकरी सभेत केला. शिवसेना हा दुतोंडी साप आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. यावर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये अजित पवार यांचा समाचार घेतला.

अजित पवारांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, सत्तेत असताना ज्या अजित पवारांनी धरणात लघुशंका करण्याची भाषा वापरुन शेतकर्‍यांची अवहेलना केली. तेच आता शिवसेनेवर टिका करत आहेत. जनतेने कोपर्‍यात फेकून दिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेवर टिका करु नये, असे देखील त्यांनी सुनावले.  ते पुढे म्हणाले की, आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये जमा झालेलो नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्याची अमंलबजावणी प्रत्यक्षात होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. आजपर्यंत किती शेतकरी कर्जमुक्त झाले याची आम्ही यादी मागविणार आहोत. कारण आम्हाला सर्व पारदर्शक पाहिजे, असे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी  मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला. मंत्रीमंडळाच्या बैठकित व येणार्‍या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याच्या सुचना सर्व मंत्री व आमदारांना देण्यात आल्या आहेत. कर्जमाफी २०१६ ऐवजी २०१७ पर्यंत करावी तसेच शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांची उचल तात्काळ द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.