चाचणी यशस्वी, देशी बनावटीचा पहिलाच प्रयोग
येथील वाहन संशोधन व विकास संस्थेने (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीई) या लष्करी अस्थापनेने विकसित केलेल्या मानवरहित विमानाच्या शक्तिशाली इंजिनाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या इंजिनाला उड्डाण प्रमाणपत्र मिळाले असून ते मिळवणारे पूर्णपणे भारतीय बनावटीचे हे पहिलेच इंजिन आहे. हवाई दलातील निशांत या मानवरहित विमानाचे या इंजिनाद्वारे उड्डाण करण्यात आले.
व्हीआरडीईच्या तंत्रज्ञांनी अथक परिश्रमातून बनवलेल्या या रोटरी इंजिनने (व्ॉन्केल प्रकार) व्हीआरडीईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कर्नाटकातील कोलार येथे दि. २२ व २४ जानेवारीला या इंजिनाची चाचणी घेण्यात आली. त्याची माहिती आज नगरमध्ये देण्यात आली. निशांत या मानवरहित विमानाला घेऊन या इंजिनाने यशस्वीरीत्या साडेतीन तास उड्डाण केले. समुद्रसपाटीपासून ३.७ किलोमीटर उंचीपर्यंत या विमानाने सहजगत्या हे उड्डाण केले. या काळात इंजिनाच्या इतर सर्व चाचण्याही यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. अपेक्षेपेक्षा अधिक क्षमतेने या इंजिनाने सर्व निकष पूर्ण केले.रोटरी इंजिन मुळातच शक्तिशाली म्हणून ओळखले जाते. या इंजिनाचे वजन अवघे ३० किलो असून ते ५५ अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) तयार करते. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या इंजिनाच्या या यशस्वितेने व्हीआरडीई व डीआरडीओसह देशाचा गौरव वाढवल्याचे व्हीआरडीईचे संचालक मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. विभागप्रमुख डी. राधाकृष्ण, त्यांचे सहकारी अभिषेक तापकिरे, गणेश येवले, जी. एस. पांचाल, पोपट शेजवळ, राजकुमार आंधळे, सुरेश दहिफळे, राजकुमार मुनोत, रवींद्र चन्ना, इम्रान सय्यद, गौरव अग्रवाल यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.