भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकाधिक मराठी तरूणांनी समाविष्ट व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणांतर्गत कोल्हापूर केंद्रात २०१६ मधील प्रशिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘सहाय्यक भविष्य निधी आयुक्त’ पदासाठी घेतली जाणारी परीक्षा एकाच दिवशी म्हणजे १० जानेवारीला होणार असल्याने विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत.
खरेतर केंद्रीय लोकसेवा आयोग आपल्या परीक्षांच्या तारखा वर्षभर आधीच जाहीर करते. त्या लक्षात घेऊन राज्यांनी त्यांच्या परीक्षांच्या तारखा निश्चित करणे अभिप्रेत मानले जाते. परंतु, कोल्हापूरच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राची पूर्व परीक्षेची तारीख निश्चित करताना त्याचा विचार झाला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांंना पूर्णवेळ प्रशिक्षण दिले जाते. कोल्हापूरच्या केंद्रात चांगल्या सुविधा असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांचा तिथे प्रवेश मिळावा असा प्रयत्न असतो. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही परीक्षा १० जानेवारी रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत होणार आहे. मात्र, याच दिवशी सकाळी दहा ते बारा या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कामगार व स्वयंरोजगार मंत्रालयातील १७० सहाय्यक भविष्य निधी आयुक्त पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई हे राज्यातील एकमेव परीक्षा केंद्र आहे. ही परीक्षा देऊन काही मिनिटांत कोल्हापूर गाठणे अशक्यप्राय आहे.
सहाय्यक भविष्य निधी आयुक्त पदासाठी दोन-तीन वर्षांत प्रथमच परीक्षा होत आहे. त्यासाठी आधीच अर्ज भरणाऱ्या कित्येकांना कोल्हापूर केंद्राची पूर्व परीक्षा देण्याचीही इच्छा आहे. परंतु, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने कोणत्यातरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार असल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. कोल्हापूर केंद्राच्या पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल झाल्यास दोन्ही परीक्षा देणे शक्य होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. कोल्हापूर केंद्राच्या पूर्व परीक्षेची तारीख निश्चित करताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक, महाराष्ट्रातील इतर सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र व विद्यापीठाच्या परीक्षा यांचे अवलोकन करण्यात आले होते. कोल्हापूर केंद्राची पूर्व परीक्षा आणि उपरोक्त तारखा एकाच दिवशी येणार नाही, याची दक्षताही घेतली गेली. सहाय्यक भविष्य निधी आयुक्त पदासाठीची परीक्षा तीन वर्षांतून एकदा होते. उपरोक्त प्रक्रियेत ही बाब निदर्शनास आली नाही. एकाच दिवशी परीक्षा होत असल्याने या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा केली जाईल.
– वरिष्ठ अधिकारी, (भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर)