12 July 2020

News Flash

सातारा जिल्हा रुग्णालयात ‘रोबो’चा वापर

करोनाविरुद्ध लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत

संग्रहित छायाचित्र

विश्वास पवार

करोनाविरुद्ध लढाई लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता जिल्हा रुग्णालयात ‘रोबो’ची मदत घेण्यात येणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ने हा रोबो दिला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी व करोनाबाधित रुग्णांशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी या ‘रोबो’चा वापर होणार आहे. येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात हा ‘रोबो’ दाखल झाला असून त्याचा वापर लवकरच सुरू होणार आहे.

सातारा जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ही सव्वाशेच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्य़ात कराड येथे कृष्णा रुग्णालय आणि सातारा शहरातील जिल्हा रुग्णालयात करोनाच्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे इथे उपचार करणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. रुग्णांची तपासणी, उपचार व अन्य कामात असलेल्या आरोग्य कर्मचारीही या संसर्गाने बाधित झाले आहेत.

यामध्येही वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांपेक्षा या वॉर्डमधील सफाई कर्मचारी, मदतनीस, जेवण पुरविणारे कर्मचाऱ्यांना या रुग्णांजवळ जास्त वेळा जावे लागते. जिल्हा रुग्णालयात ‘पीपीई किट’सह अन्य सुविधांचा अभाव आहेच. त्यातच रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्याला याची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी कायम दडपणाखाली काम करत आहेत.

या कर्मचाऱ्यांचा करोनाबाधित रुग्णाशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी राज्यामध्ये काही ठिकाणी यापूर्वीच रोबोचा वापर सुरू केला आहे. रोबोची कामाची व वापराची माहिती घेऊन साताऱ्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातही अशा प्रकारचा रोबो असावा, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाठपुरावा केला. त्यातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’ने हा रोबो दिला आहे. हा रोबो जिल्हा रुग्णालाणत दाखल झाला असून तो करोना वॉर्डमध्ये काम करणार आहे.

या रोबोमुळे रुग्णाला दिवसातून दिली जाणारी औषधे, जेवण किंवा अन्य वस्तू लांबून देता येणे शक्?य होणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णाशी येणारा संपर्क कमी होणार आहे. परिणामी त्यांना करोनाची बाधा होण्याचा धोकाही कमी होणार आहे.

सातारच्या जिल्हा रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सध्या एकच रोबो उपलब्ध झालेला आहे. त्याचे कार्य कशा प्रकारे होते, हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर जिल्ह्यसाठी आणखी रोबो मागविले जाणार आहेत. रोबो हाताळण्याचे प्रशिक्षण आज आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्यक्ष वॉर्डमध्ये त्याची कशी मदत होते, याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 12:42 am

Web Title: use of robot in satara district hospital abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मालेगावात आता ११९ प्रतिबंधित क्षेत्रे 
2 जळगाव जिल्ह्यात करोनाचे नवीन सात रुग्ण
3 टाळेबंदीमुळे भाव नसल्याने खरबूज फेकण्याची वेळ
Just Now!
X