वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून यावेळी काही ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्र बंद हा पूर्णपणे ऐच्छिक आहे. आम्ही प्रत्येकाने कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं तसंच शांततेच्या मार्गाने बंद करण्याचं आवाहन करतो”.

महाराष्ट्रात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून औरंगाबादमध्ये सिटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. अमरावतीत इर्विन चौकाजवळ आंदोलकांनी दुकानावर दगडफेक केली. दुसरीकडे अकोल्यात वंचित आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तर मुंबईत घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर मोर्चा काढत आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यात प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. ठाण्यातही नौपाडा येथे पोलीस ठाण्यासमोर तोडफोड करण्यात आली.

बंद कशासाठी ?
देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. अनेक राज्यांमध्ये यावरुन आंदोलनं आणि जाळपोळही झाली. सरकारने हा कायदा लागू केला आहे यामागे त्यांची दडपशाही आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi prakash ambedkar maharashtra bandh sgy
First published on: 24-01-2020 at 12:18 IST