विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस असो की इतर कोणताही पक्ष आमची कोणत्याही पक्षाशी बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आमच्या उमेदवारांची पहिली यादी ३० जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा पराभव हा ईव्हीएममुळे झाला आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच ईव्हीएम विरोधात आपण कोर्टात जाण्याची तयारी करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बऱ्याच मतदारसंघांमध्ये मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीची आकडेवारी यामधल्या आकड्यांमध्ये तफावत आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसने पुरावे द्यावेत किंवा आमच्या उमेदवारांना राज्यभरात ४० लाख मतं देणाऱ्या जनतेची माफी मागावी अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने त्यांचे उमेदवार उभे केले होते. मात्र औरंगाबादचा अपवाद वगळता त्यांना कुठेही यश मिळाले नाही. असे असले तरीही विधानसभेसाठी आम्ही सर्व जागा लढवू असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.