मनोहर भोईर, शिवसेना उरण

उरण विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजपाच्या महायुतीचा मी उमेदवार आहे. माझ्या विरोधात भाजपचा बंडखोर उभा असला तरी बंडखोर हा बंडखोरच असतो त्यामुळे सच्चे महायुतीतील कार्यकर्ते माझ्या मागे असल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार आमदार मनोहर भोईर यांनी लोकसत्ताशी बोलतांना केला आहे. आपल्या मुलाखतीत त्यांनी बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी येथील समाजा बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तयाव्या बद्दल शिवसेना जाहीर निषेध करीत आहे. तसेच या निवडणूकीत येथील समाज त्यांना त्यांची जागा दाखवून धडा शिकविल असेही मत त्यांनी व्यक्त केले. समाजात महिलांचा आदर न करता राजकारण करता येत नाही. केवळ अहंकारापोटी समाजा बद्दल बेताल वक्तव्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महायुती होऊनही बंडखोरी झाली आहे?

महायुती होऊनही त्यांनी बंडखोरी केली असली तरी आम्ही महायुतीचाच एक भाग आहोत. महायुतीची मते ही आपणालाच मिळणार असल्याने आमच्या कडून महायुतीचा धर्म पाळला जाईल याचीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बंडखोरी केल्याने महेश बालदी यांच्यावर पक्षाने निष्काशनाचा कारवाई केली आहे. त्यानंतर भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आपला प्रचार केला नाही.

 

बंडखोरांवर भाजपने हकालपट्टी केल्यानंतर भाजपचा बडा नेता प्रचारात होता का?

मी स्वता भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ यांची भेट घेऊन त्यांना आपल्याला मदत करण्याची विनंती केली आहे. परंतू बंडखोरा कडून आपल्याला रामशेठ यांचा पाठींबा असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न सुरू असून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निवडणूकीत शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे आपले स्पर्धक आहेत. त्यांच्या बरोबरच आपली स्पर्धा आहे.

 

 या वेळी तुमची मुख्य लढत कोणाबरोबर आहे?

शेकाप काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकत्र आलेले असलेल तरी त्यांची मागील पाच वर्षांत मोठी परझड झाली आहे. त्यामुळे त्यांची मते घटली आहेत. असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आपणच या मतदार संघात प्रथम क्रमांकावर आहे. या निवडणूकीत मुख्य लढत ही शिवसेना व शेकाप आघाडी यांच्यातच होणार आहे

 

  शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने तुमच्यावर काय परिणाम होईल?

शिवसेना सोडून काही कार्यकर्ते हे स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. असे असले तरी त्यामुळे आमचे कोणतेही नुकसान होणार नाही. कारण आमच्याकडेही भाजपा सारख्या पक्षातून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. उरण पनवेल व खालापूर मधील पदाधिकाऱ्यांचा भाजपाच्या बंडखोराला छुपा पाठींबा असला तरी आपल्यालाही भाजपा कडून मदत होईल .

 

उद्धव ठाकरे तुमच्यासाठी सभा घेणार आहेत, त्याचा काही फायदा होईल का?

शनिवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उरण मध्ये सभा होत असून त्याचाही फायदा मला होईल. मागील पाच वर्षां पासून आपण जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आपण या मतदार संघात जनतेची सकारात्म कामे केली आहे. त्यांच्याशी पाच वर्षे संपर्क ठेवला आहे. त्यामुळे नकारात्मक(अन्टी इन्कबंन्सी)चा परिणाम होणार नाही.

पुढील काळात तुम्ही काय करणार आहात?

पुढील काळात उरण मधील आरोग्याची प्रथम समस्या असलेले रूग्णालय उभारणे, जलप्रवासातील अडथळे दूर करून तो सुरळीत करणे, द्रोणागिरी नोड मध्ये ज्येष्ठ नागरीकांकरीता नाना नानी पार्क,पनवेल मोहपाडा पर्यंत मेट्रो सुविधा निर्माण करणे तसेच जून्या मुंबई पुणे महामार्गा लगत उपचारा करीता ट्राम केअर सेंटरची उभारणी आदी कामांना प्राधान्य देण्यात येईल.

मुलाखत : जगदीश तांडेल