News Flash

‘मातृमंदिर’चे विजय नारकर यांचे निधन

गेले काही महिने नारकर यांची प्रकृती तितकीशी साथ देत नव्हती.

देवरुखच्या ‘मातृमंदिर’ या सामाजिक संस्थेची धुरा गेले अर्धशतक समर्थपणे पेलणारे विजय नारकर (वय ७९ वष्रे) यांचे मंगळवारी पहाटे वृद्घापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे सामाजिक कार्यात समर्पित भावनेने काम करत असलेल्या पत्नी शांताताई आहेत.

गेले काही महिने नारकर यांची प्रकृती तितकीशी साथ देत नव्हती. तरीही संस्थेचे उपक्रम चालू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. मात्र वाढत्या वयोमानामुळे शरीर साथ देत नव्हते. त्यातच मंगळवारी त्यांचे निधन झाले. समाजवादी विचारसरणीच्या मुशीत वाढलेल्या नारकरांनी देहदान केले. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनानंतर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या सहवासामुळे नारकरांचा तरुण                                                                                                                                                                 वयापासूनच सामाजिक कार्याकडे ओढा होता. १९५७ ते १९६९ या काळात त्यांनी विनोबा भावेंची भू-दान चळवळ व ग्रामदान कार्यामध्ये भाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळ तालुक्यामधील माणगावचे खोरे हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. या खोऱ्यातील २८ गावांमध्ये नारकरांनी शेतकरी व ग्रामविकासाचे प्रभावी कार्य केले.

समाजवादी नेत्यांच्या सूचनेवरून १९६९ मध्ये नारकर संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे कै. इंदिराबाई ऊर्फ मावशी हळबे यांच्या ‘मातृमंदिर’ संस्थेच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आणि नंतर आयुष्यभर तेथेच रमले. याच ठिकाणी शांताताईंशी त्यांचा परिचय झाला आणि दोघांनी  विविध अंगांनी संस्थेचे कार्य पुढे नेले. मावशी हळबेंच्या निधनानंतर ‘मातृमंदिर’च्या कार्याची ध्वजा फडकत ठेवण्याचे श्रेय नारकर दाम्पत्याकडेच जाते. ज्येष्ठ नेते कै. नानासाहेब गोरे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, प्रा. मधू दंडवते इत्यादी नामवंतांचा या उभयतांना मार्गदर्शन लाभले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 12:59 am

Web Title: vijay narkar
Next Stories
1 सोलापुरात भाजप-सेना आक्रमक
2 Pankaja Munde: मराठ्यांना इतके वर्ष न्याय का दिला नाही; पंकजा मुंडेंचा सवाल
3 कपडे वाळत घालताना विजेचा धक्का बसल्याने कोल्हापुरात दाम्पत्याचा मृत्यू
Just Now!
X