सूर्या प्रकल्पमधील कवडास धरणाची  उंचीस विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी सूर्यानगर येथे पाटबंधारेच्या कार्यालयावर स्थानिक ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढला.  पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे पत्र देऊन देखील यावेळी एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण होते.

मीरा-भाईंदर आणि वसई-विरारला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित  कवडास  बंधाराची उंची ‘एमएमआरडीए’ने वाढविण्याच्या  कामाला सुरुवात केली आहे.

या विकास प्रकल्पाचा स्थानिकांना मात्र काहीच काडीमात्र फायदा नाही. या प्रकल्पामुळे त्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील स्थानिक पातळीवर गावकऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. कवडास धरणाची तीन मीटर (अंदाजे दहा फूट) एवढी उंची वाढवण्यात येणार आहे.

त्यामुळे कवडास बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याची भिती आहे. त्यातच स्थानिक लोकांनी मोर्चा काढून बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला जाहीर निषेध केला आहे. मनोर येथील   मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासहप्रकल्पबाधित कोसेसरी, भोवाडी, धरमपूर, तलवाडा येथील ग्रामस्थ  यावेळी उपस्थित होते.

कवडास धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्पास स्थानिकपातळीवर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. जर एखादा नवीन प्रकल्प येतो त्याचा फायदा हा स्थानिकांना झाला पाहिजे परंतु सरकार नुकसान करण्याचे काम  करीत आहे.

-कविता धांगडा, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भवाडी