कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकलाबदली झाली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, नाशिकचे आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.

नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील हे आजच आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तर सिंघल यांची औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही आजच पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील एकूण 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांना मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याचे समजते.

विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान असलेले पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा आयपीएसपर्यंत प्रवास अत्यंत कष्टप्रद आहे. पाटील हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड हे त्यांचे मूळ गाव. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलिस सेवेत रुजू झाले.

विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द –
– लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
– अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
– पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– मुंबई पोलीसदल उपायुक्त
– ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
– पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र