वर्धा जिल्ह्यातील हिवरा तांडा या गावात एका महिलेचा करोनाने  मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वीच परिसरातील गावाची नाकाबंदी करणे सुरू झाली आहे.

आर्वीपासून दहा किलोमिटर अंतरावरील हिवरा तांडा या गावामधील ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. सदर महिलेची करोना तपासणी सकारात्मक आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला उपचारार्थ आर्वीच्या रूग्णालयात दाखल झाली होती. प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने तिला सावंगीच्या रूग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र या  ठिकाणी दाखल होत असतांनाच ८ मे रोजी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. दमा व डायरिया झाल्याने ती उपचारासाठी आली होती. मात्र करोना तपासणीत ती करोनाबाधित असल्याचे आज आढळून आल्याने प्रशासनात गोंधळ उडाला.

या महितीनंतर एक तासापूर्वीच हा परिसर बंद करण्यात आला आहे. मृत महिलेच्या हिवरा तांडा सोबतच हराशी व हिवरा या गावातील ये‑जा बंद करण्यात आली आहे. सदर गावाच्या तीन किलोमिटर परिसरातील गावातील वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. लगतच्या वाढोणा व थार या गावातील वाहतुकसुध्दा बंद होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातीलच रूग्ण आढळल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनचा लौकीक गमावून बसण्याची वेळ आली आहे.