प्रशांत देशमुख

वर्धा जिल्ह्यातील करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पिपरी लग्न सोहळ्यातील एक जण आणि उत्तम गलवा येथील एका कर्मचाऱ्यासह वाशीमचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. असे सात जण आज (रविवार) सकाळी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डावले यांनी माहिती दिली.

काल पाच व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सात जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याचे चित्र चिंताजनक आहे.

धुळे येथून परतलेल्या उपजिल्हाधिकारी यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र ते डॉक्टरकडे भेट देण्यासाठी गेल्याने अन्य कोणाच्या संपर्कात आले, याबाबत माहिती घेणे सुरू झाले आहे. तर दुसरीकडे काल एका लग्न सोहळ्यातील वर, वधू, मामाची मुलं, वधूच्या मैत्रिणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आज एकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या लग्नात बरीच गर्दी झाल्याची माहिती नंतर मिळाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शहरात सध्या कडक संचारबंदी लागू आहे.