News Flash

वर्धा : ई-पास सेवेचा गैरफायदा घेत २३ वेळा केला अर्ज; प्रशासनाकडून गुन्हा दाखल

वारंवार रेड झोन असलेल्या जिल्ह्यात गेल्याने कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रशांत देशमुख

इतर जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तीना स्वजिल्ह्यात परत येण्यासाठी शासनाने ई-पासची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, वर्धा शहरातील एका नागरिकाने ई-पास सेवेचा गैरफायदा घेत २३ वेळा अर्ज केला. एकच व्यक्ती वारंवार अर्ज करून बेकायदा रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात जात असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना स्वतःच्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी ऑनलाइन परवानगी मिळण्याकरिता शासनाने ५ मे नंतर ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी http://covid19.mhpolice.in या संकेस्थळावर ऑनलाइन अर्ज करून ई-पास मिळवता येत आहे. विविध जिल्ह्यात अडकलेल्या १० हजारांच्यावर नागरिकांनी ई-पास घेऊन आत्तापर्यंत वर्धेत प्रवेश केला आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या कक्षात त्यांच्यासाहित ९ व्यक्ती दोन पाळीमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ४ आणि सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत काम करून ई-पास मंजूर करतात. या अत्यावश्यक सेवेचा मनिष गुल्हाणे या व्यक्तीने गैरफायदा घेतला. केशवसिटी येथील राहणाऱ्या या व्यक्तीने यवतमाळला अप-डाऊन करण्यासाठी तब्बल २३ वेळा ई-पास काढण्यासाठी अर्ज केला. पास मंजुरी वेगवेगळ्या व्यक्तींकडे येत असल्यामुळे ते लगेच लक्षात आले नाही.

त्यामुळे ई-पास काढून त्याने तीन ते चार दिवस येणे जाणे केले. मात्र, दोन दिवसांपूर्वी ई-पासचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांच्या या व्यक्तीचे लागोपाठ दोन-तीन वेळा अर्ज दिसले. ही बाब निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर या व्यक्तीने केलेल्या मागील सर्व अर्जांची माहिती काढण्यात आली. या माहितीत मे आणि जून महिन्यात प्रवास करण्यासाठी त्याने तब्बल २३ वेळा अर्ज केल्याचे समोर आले. ४ वेळा त्याचा पास मंजूर झाला तर १० वेळा त्याने केलेल्या अर्जाचा नंबर येईपर्यंत त्याची प्रवासाची तारीख निघून गेलेली होती. सहा वेळा त्याचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला, तर तीन अर्ज पेंडिंग असल्याची माहिती पुढे आली.

त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी तहसीलदार वर्धा यांना संबंधित व्यक्तीची पोलीस तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी काल रात्री साडेसात वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संबंधित व्यक्तीविरुद्ध भादंवि १८६० कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीत व्यक्तीला संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे गृहविलगिकरण करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 5:23 pm

Web Title: wardha entered red zone often taking advantage of e pass service filed a crime by the administration aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: रस्त्यावर थुंकणाऱ्यांना भरावा लागणार दंड, भोगावी लागणार शिक्षा
2 करोनाच्या लढ्यावर लक्ष केंद्रीत करा, आकडेवारीवर नाही – देवेंद्र फडणवीस
3 एक फ्लॅट अनेकांना विकला; सोलापुरातील भाजपा उपमहापौरांना अटक
Just Now!
X