वर्धा जिल्ह्यातील चार रूग्णांना आज करोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली असून, याचबरोबर वर्धेकर असणारे सर्व रूग्ण करोनामुक्त झाल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. मात्र, इतर जिल्ह्यातील तीन रूग्ण अद्यापह वर्ध्यात उपचार घेत आहे. तर, वर्ध्याच्या एका रूग्णावर सिकंदराबाद येथे उपचार सुरू आहे.

आज दिवसभरात हिंगणघाट तालुक्यातील एक दाम्पत्य तसेच वर्धा तालुक्यातील परिचारिका व तिच्या नातेवाईकास पूर्ण उपचाराअंती सेवाग्राम व सावंगीच्या रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. हे चारही रूग्ण मुंबईतून वर्धेत आले होते. त्यांना पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात आठ करोनाबाधीत रूग्ण आढळून आले होते. १० मे पूर्वी एकही रूग्ण नसलेल्या या जिल्ह्यात त्यानंतर परगावातून येणाऱ्या व्यक्तींमूळे रुग्ण संख्येत वाढ झाली होती. जिल्ह्यातील आठ रूग्णांमध्ये आर्वी‑२, आष्टी‑०१, हिंगणघाट‑२ व वर्धा‑३ अशी आकडेवारी आहे. आर्वी येथील एका रूग्णाच्या मृत्यूनंतर तो करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. तर वर्धेतील एक सिकंदराबादेत करोनाबाधित झाल्याने तो तिथेच उपचार घेत आहे. इतर जिल्ह्यातील उपचारासाठी वर्धेत आलेल्या १२ रूग्णांपैकी सात रूग्ण करोनामुक्त झाले असून, तिघांवर उपचार सुरू आहे.

वाशिम व धामणगाव येथील प्रत्येकी एक अशा दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयातून सुट्टी मिळालेल्या व्यक्तींना रूग्णालयाच्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.