वर्धा जिल्हयात सुरु असलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गाची कामांमुळे अपघातचे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे रस्त्याचे बांधकाम करतांना एका बाजुकडील रस्ता वाहतुकीस मोकळा ठेऊन रस्त्याच्या कामाल गती दयावी, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी राष्ट्रीय महामार्ग व संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत केली आहे. तसेच, सबंधित अधिकारी व विकासक कंपनी रस्ते सुरक्षित ठेवण्याबाबत कार्यवाही करीत नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले

आज (बुधवार) वर्धा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, समितीचे सदस्य सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकलप संचालक सुनिल मेंढे व अन्य हजर होते

जिल्हयात बुटीबोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच सेलडोह –हमदापूर, सेवाग्राम- पवनार, वर्धा- हिंगणघाट, वर्धा- आर्वी – तळेगाव या राज्य महामार्गाची कामे सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तातडीने रस्त्याची सुरक्षा विषयक तपासणी करुन करारनाम्यातील तरतूदीनुसार सुरक्षा विषयक उपाययोजना केली जात आहे किंवा नाही याचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच पावसाळयापुर्वी नागरिकांना व प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, या करीता उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

वर्धा शहरातील बजाज चौक उड्डाण पुल केद्रींय मार्ग निधी योजनेतून मंजूर असुन या कामासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही संबंधित कत्राटदार कंपनीने काम पूर्ण केलेले नाही. अनेक ठिकाणी रस्ता व पुलाचा मार्ग प्रलंबित बांधकामामुळे वाहतुकीकरीता असुरक्षित आहे. त्यामुळे संबधित कत्राटदारांवर दंडात्मक कार्यवाही करावी असेही  तडस यांनी सांगितले.

आमदार पंकज भोयर व दादाराव केचे यांनी वर्धा व आर्वी विधानसभा क्षेत्रातील रस्ते सुरक्षा विषयक समस्यावर कार्यवाही करण्याकरीता सुचित केले. यामध्ये शिवाजी चौक ते आर्वी नाका, येळाकेळी – सेलू रस्ता, खरांगना ते कोंढाळी राज्यमहामार्ग, देऊरवाडा रस्ता व शहरातील अतिक्रमण तसेच तसेच राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत समस्यावर तोडगा काढण्याकरीता सूचना केल्यात.