– प्रशांत देशमुख

विविध व्याधींमुळे जवळ आलेल्या मृत्यूला यशस्वी हुलकावणी देणाऱ्या लोकप्रिय समाजसेविका सरोजा काकी यांना अखेर करोनानं गाठल्यानं निधन झालं. त्यांचा मृत्यूमुळे आर्वीकर हळहळ व्यक्त करीत आहेत.

आर्वी येथील प्रसिध्द व्यावसायिक केला कुटुंबातील सरोजादेवी सुंदरलाल केला यांचे आज अमरावतीत वयाच्या ७९ व्या वर्षी दु:खद निधन झाले. आर्वी शहरातील एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माहेश्वरी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा राहलेल्या श्रीमती केला यांनी मृत्यूपूर्वी २१ दिवस विविध अडचणींवर मात करीत दिलेली झुंज चटका लावणारी ठरली आहे. श्रीमती केला यांची ११ जूलैला प्रकृती विघडल्याने कुटुंबियांनी त्यांना प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरूण पावडे यांच्याकडे तपासणीसाठी नेले. मात्र, विविध उपचारांच्या सोयीसाठी डॉ. पावडे यांनी त्यांना अन्यत्र दाखविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अमरावतीच्या झेनिथ रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तीन रक्तवाहिन्यांत बाधा असल्याने त्यांची अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान रूग्णालयातील एक परिचारिका करोनाबाधित निघाल्याने त्यांना त्वरित सुट्टी देण्यात आली. अमरावती येथे मुलाकडे मुक्कामी असतांनाच त्या घसरून पडल्याने त्यांच्या पाठीचे हाड मोडले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

दरम्यान, बंद झालेले झेनिथ रूग्णालय परत सुरू झाल्याने श्रीमती केला यांना या रूग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी हाड जोडण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले असतांनाच त्याच दिवशी झेनिथच्या एका डॉक्टराला करोनाबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. परिणामी श्रीमती केला यांना डॉ. बोंडे रूग्णालयात हलविण्यात आले. कुटुंबियांची उपचारासाठी अशी धावपळ सुरू असतांनाच श्रीमती केला यांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला. धक्यावर धक्के बसणाऱ्या केला कुटुंबियांनी सरोजाकाकींना कोविड रूग्णालय असलेल्या दयासागरमध्ये उपचारार्थ हलविले. या ठिकाणी अन्य व्याधींचे उपचार बंद करून केवळ कोविडचाच उपचार सुरू झाला. या धावपळीत त्यांच्या संपर्कात असलेल्या ११ व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली. सर्वाचा अहवाल नकारात्मक आला.

मात्र, आर्वी येथून आईची प्रकृती पाहण्यासाठी गेलेल्या लहान मुलगा संदीपचा अहवाल सकारात्मक आला. त्यालाही आईसोबतच दयासागरमध्ये भरती करण्यात आले. तो सुखरूप होवून आर्वीला परतला. सुचनेनुसार तो गृह विलगीकरणात आहे. श्रीमती केला यांना आज सुट्टी देण्याची तयारी सुरू असतांनाच दुसरा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृतीही ढासळली. उपचार सुरू झाले. मात्र आज अखेर सकाळी त्यांचे निधन झाले. २१ दिवसाच्या विविध उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या काकींना करोनाचा हल्ला घात करणारा ठरला.

त्यांच्यावर ठराविक लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा बंदी असल्याने लहान मुलगा उपस्थित राहू शकत नसल्याने व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला आईचा अखेरचा प्रवास साश्रू नयनाने पाहावा लागला. एवढेच नव्हे तर अकोला, मुंबई व नागपूर येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलींनाही असेच अंत्यदर्शन घ्यावे लागले. आर्वीतल्या अनेक कुटुंबाच्या सुखदु:खास सहभागी राहलेल्या काकींच्या अंतिम प्रवासाला हजर राहता न आल्याची हुरहूर आर्वीकर व्यक्त करीत आहे. समाजासाठी काकी असणाऱ्या सरोजादेवींना त्यांची मुलसुध्दा काकीच म्हणत. आज पती सुंदरलाल यांच्या वाढदिवशीच त्यांना आलेला मृत्यू वेदनेला वेगळी किनार देणारा ठरला.