साप म्हटलं तरी अनेकांच्या अंगाला काटा येतो. अनेकांना सापांचे व्हिडिओ पाहताना भिती वाटते. मात्र अहमदनगरमधील एका रुग्णालयात जमीनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात साप शिरला तरी त्याला जाग आली नाही. नगरमधील एका सरकारी रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराची सध्या नगरमध्ये चांगलीच चर्चा आहे.

अहमदनगरमधील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आपल्या नातेवाईकास भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या खिशातून साप काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पांढरा कुर्ता आणि धोतर घातलेली वयस्कर व्यक्ती रुग्णालयामध्ये जमीनीवर झोपलेली दिसत आहे. या व्यक्तीच्या बाजूने जाणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला या व्यक्तीच्या कुर्त्यामध्ये हिरव्या रंगाचा साप शिरताना दिसला. या व्यक्तीने लगेचच अहमदनगरमधील वन्यजीव संरक्षण सोसायटीच्या सदस्यांना मदतीसाठी फोन केला. काही मिनिटांमध्ये सर्पमित्र आकाश जाधव आणि त्यांचे सहकारी या रुग्णालायात पोहचले. त्यापैकी एकाने झोपलेल्या व्यक्तीच्या कुर्ता हळूच वर करुन त्यामध्ये हात घालत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला दिसलेला हिरव्या रंगाचा साप बाहेर काढला. विशेष म्हणजे या सापाची संपूर्ण रुग्णालयामध्ये चर्चा असताना ज्या व्यक्तीच्या कुर्त्यामध्ये हा साप शिरला त्याला साप पुन्हा बाहेर काढेपर्यंत जागही आली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

या व्यक्तीच्या कुर्त्यामध्ये शिरलेला साप हा ग्रीन किलबॅक प्रजातीचा साप होता अशी माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. या सापाला महाराष्ट्रातमध्ये गावत्या या नावाने ओळखले जाते. हा साप बिनविषारी असल्याचेही त्यांनी सांगितले.