लातूरमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी आखलेल्या रेल्वेने पाणी पुरवठा योजनेस सोमवारी प्रारंभ झाला.  सकाळी ५ लाख लीटर पाणी घेऊन ही ‘पाणी गाडी’ लातूरला रवाना झाली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, लातूरसाठी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हे काम शुक्रवापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासन व ‘जीवन प्राधिकरण’च्या सूत्रांनी व्यक्त केला.  लातूर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून येणारे पाणी उतरून घेणे व टँकरद्वारे ते पाठवणे याची तयारी सायंकाळी अंतिम टप्प्यात होती. पाणी एक्सप्रेस लातूरला नेमकी किती वाजता पोहोचेल, हे सांगण्यास कोणीच तयार नव्हते.

लातूरसाठी रेल्वेने मिरजेहून पाणी देण्याची योजना महसूलमंत्री एकनाथ खडसे व लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य करून तसे आदेश दिले होते. यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करीत असतानाच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पाणी वाहतूक करण्यासाठी ५४ हजार लीटर पाणीक्षमतेच्या ५० वाघिणींची ही रेल्वे गाडी पाठवली.

१० लाख लीटर पाणी जाणार

चाचणी तत्त्वावर पहिली १० डब्यांची गाडी आज लातूरला रवाना झाली. यानंतर उपलब्ध यंत्रणेकडून पुन्हा १० वाघिणींमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले.