X
Advertisement

“बंगालमध्ये केंद्र सरकारचे मंत्री सुरक्षित नसतील, तर सामान्य माणसाची सुरक्षा काय असेल?”

केंद्रीयमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या वाहन ताफ्यावरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपा नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. यंदाची निवडणूक भाजपा व टीएमसीमधील राजकीय संघर्षामुळे चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, आता निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचार उफळल्याचं दिसत आहे. यामध्ये आतापर्यंत काही जणांचा जीव देखील गेला आहे. दरम्यान, आज(गुरूवार) केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देखील घडली. या घटनेचा भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तर, राज्यातील भाजपा नेत्यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत, पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी पश्चिम बंगाल येथील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात हल्ला केला. यामध्ये त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे.

“स्वतंत्र भारताच्या इतिहासातील या भयंकर आणि सर्वात वाईट हिंसाचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि कठोर कारवाईची मागणी देखील करतो आहोत. पहिल्यांदा बंगालमधील हजारो कार्यकर्ते आणि आता केंद्रीयमंत्री!” अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

तर, “मिदनापूर येथे ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्यसभेचे खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर केलेला हल्ला निंदाजनक आहे. ज्या बंगालमध्ये केंद्र सरकारचे मंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाची सुरक्षा काय असेल? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर “भारताच्या विदेश राज्यमंत्र्यांवर पश्चिम बंगालमध्ये दिवसा ढवळ्या जीवघेणा हल्ला करण्यात येतो, म्हणजे हे राज्य भारतात आहे की नाही? असा प्रश्न पडतो. केंद्र सरकारने कडक उपाययोजना आखून या विषवल्लीचे वेळीच समूळ उच्चाटन करावे. ” असं भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील पंचकुडी भागात केंद्रीयमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व्ही. मुरलीधरन यांच्या वाहन ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केलेला हल्ला हा संतापजनक आहे. जर मंत्री असुक्षित आहे, तर सामान्य माणूस राज्यात किती सुरक्षित असेल? असा प्रश्न भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; भाजपाकडून घटनेचा निषेध!

दरम्यान, या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी तृणमूलवर टीका केली आहे. “जर एखाद्या मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला होत असेल, तर बंगालमध्ये कोण सुरक्षित आहे? हा राज्य-पुरस्कृत हिंसाचार आहे. बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. या घटनेमधील दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष पावलं उचलण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे बंगालमध्ये येत्या काही दिवसांमध्ये हिंसाराच्या घटनांवर मोठं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

20
READ IN APP
X