राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदा परीक्षा कशापद्धतीने होणार? याबद्दल पालकांच्या मनात शंका होत्या. अखेर आज(शनिवार) राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील या विविध शंकांचं निरसन करत, इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती दिली. याचबरोबर परीक्षाकाळात एखाद्या विद्यार्थ्यास किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यास करोनाचा संसर्ग झाला, तर अशावेळी त्या विद्यार्थ्याच्या परीक्षेचे काय होणार? या अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं देखील यावेळी उत्तर देण्यात आलं.

“एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये करोनाची काही लक्षणं जाणवत असल्यास अथवा करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे किंवा लॉकडाउन, कंटेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाटी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहेत.” असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

तसेच, “इयत्ता दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यास अथवा कुटुंबातील सदस्यास प्रात्याक्षिक परीक्षा कालावधीमध्ये करोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाउन, कंटेनमेंट झोन, संचारबंदी अथवा करोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्याक्षिक परीक्षा किंवा विशिष्ट लेखन कार्य (Aassignment) सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.” अशी देखील माहिती देण्यात आली.

याचबरोबर “परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्याल, केंद्र प्रमुख पर्यवक्षेक व अन्य बाबीसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. कोविड-19बाबात केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील. सर्व विद्यार्थ्यांना/पालकांना आवाहन करण्यात येते की राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजावी.” असं देखील कळवण्यात आलं आहे.

महत्वाची बातमी : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केलं. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.