हर्षद कशाळकर

ई-रिक्षा सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद नाही

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

माणसाकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा या गुलामगिरीचे प्रतीक मानल्या जात असल्याने देशभरात या रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र वाहनांवर बंदी असल्याचे कारण पुढे करत रायगड जिल्ह्य़ातील माथेरान येथे माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा आजही सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पर्यावरण विभागाकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

माथेरान हे पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने येथे वाहन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे घोडे आणि माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा या माथेरानच्या दळणवळणाची प्रमुख साधने आहेत.  मात्र पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली माथेरानमध्ये या दोन वाहतूक साधनांचा आजही वापर केला जात आहे. माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही वाहतूक साधने आता अडसर ठरायला लागली आहे. माथेरानमध्ये घोडय़ांची लीद, मूत्र मोठी समस्या बनली आहे. दुसरीकडे घोडे उधळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ  लागले आहेत.

माथेरानमध्ये माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या ९२ रिक्षा कार्यरत आहेत. एक चालक आणि एक ते दोन सहकारी यांच्या मदतीने आजही माणसांनी ओढणाऱ्या रिक्षांची प्रथा कायम आहे. माथेरानमधील माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षांची पद्धत बंद करून त्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा सुरू कराव्यात अशी आमची मागणी आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांची होणारी पायपीट यामुळे टळू शकेल आणि पर्यटकांना किफायतशीर दरात प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्यायही उपलब्ध होईल.

गेली पाच वर्षे शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आला, मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय घ्या असे सांगत हा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्य सरकारकडे पाठवला. गेली सहा महिने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव आता विधि व न्याय विभागाकडे पाठवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दुरुस्तीचा प्रश्न कायम

माथेरानमधील अनेक मानवी रिक्षा आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जुन्या आणि जीर्ण झालेल्या रिक्षांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकाता शहरात अशा रिक्षांचा वापर केला जात असे. त्यामुळे तेथून या रिक्षांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सुटे भाग सहज उपलब्ध होत असत. आता मात्र कोलकाता येथील मानवी रिक्षांचा वापर ओसरला आहे.

पर्यावरण संरक्षणाचे कारण पुढे करत गुलामगिरीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या रिक्षांची प्रथा आजही कायम ठेवली आहे. पर्यावरणपूरक वाहनांना माथेरानमध्ये मान्यता मिळावी अशी आमची मागणी आहे. पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करूनही आमच्या मागणीची दखल घेतली गेलेली नाही.

– सुनील शिंदे, सचिव श्रमिक हात रिक्षा संघटना