करोनाबाधित रुग्ण इतर जिल्ह्यात आढळून आल्यास किंवा जिल्ह्याबाहेर त्यावर उपचार होत असले, तरी त्या रुग्णाची नोंद मूळ जिल्ह्यातच केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील आकडेवारीतून बाहेरच्या जिल्ह्यातील मृत व करोनाबाधितांची संख्या वगळण्यात आली. मात्र, मूळ बुलढाणा जिल्ह्यातील मृत व करोनाबाधितांचा अद्याप त्याठिकाणी समावेश करण्यात आलेला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार प्राप्त झाला नसल्याची माहिती बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

करोनाबाधित रुग्ण, मृत्यू व करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची नोंद जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. त्यासाठी ‘आयसीएमआर’चे ऑनलाइन पोर्टल आहे. अनेकवेळा जिल्हा व राज्य स्तरावरील आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसते. इतर जिल्ह्यातील रहिवासी रुग्णाचा ज्या जिल्ह्यात करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला, त्याच जिल्ह्यात त्याची नोंद घेतली जात होती. ऑनलाइन पोर्टलवर मात्र संबंधित रुग्णाची मूळ जिल्ह्यामध्ये नोंद केली जाते. रुग्णाने दिलेला पत्ता किंवा आधार कार्डवरील पत्त्यावरून प्रयोगशाळेतूनच थेट नोंद होते. त्यामुळे करोनाबाधितांच्या आकड्यांवरून अनेकवेळा गोंधळ झाला. करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी इतर जिल्ह्यात पाठवल्यावरही हा प्रकार घडला. हा गोंधळ दूर करण्यासाठी जिल्ह्यांमध्येही ऑनलाइन पोर्टल प्रमाणे आपल्या जिल्ह्यातीलच बाधित रुग्ण, करोनामुक्त व म़ृत्यूची नोंद घेतली जात आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यात या प्रमाणे बदल करण्यात आला.

अकोला जिल्ह्यामध्ये ९ जुलैपासून बाहेरच्या जिल्ह्यातील करोनाबाधितांवर उपचार होत असले, तरी त्याचा समावेश जिल्ह्यातील आकडेवारीमध्ये करण्यात येत नाही. संबंधित जिल्ह्यात त्यांची नोंद होणे अपेक्षित आहे. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात बुलढाणा, वाशीम, हिंगोली, अमरावती आदी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. अकोला जिल्ह्यातील एकूण आकडेवारीमध्ये त्यांची नोंदही झाली होती. मात्र, ऑनलाइन पोर्टलनुसार मूळ जिल्ह्यात नोंद होत असल्याने अकोला जिल्ह्यातून वगळण्यात येत असल्याचे प्रशासनाने २४ जुलैला जाहीर केले. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात बाहेरच्या जिल्ह्यातील ६७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. १० बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४० रुग्ण व सहा मृतांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातून हे आकडे कमी करण्यात आले असले, तरी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण आकडेवारीत त्याचा समावेश करून अद्यााप ते जाहीर करण्यात आलेले नाही. ऑनलाइन पोर्टलवर त्यांची बुलढाणा जिल्ह्यात नोंद झाली आहे. याबाबतीत वाशीम जिल्ह्यांने त्यांच्या रुग्णांची तात्काळ नोंद केली. बुलढाणा जिल्हा प्रशासन जाहीर करीत असलेली आकडेवारी पोर्टलशी जुळत नसल्याचेही दिसून येते.

आकडेवारी वाढणार – 
उपचार किंवा मृत्यू अकोला जिल्ह्यात झालेल्या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांचा अद्याप समावेश त्याठिकाणी करण्यात आलेला नाही. त्याचा समावेश करण्यात आल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मृत्यू व एकूण रुग्ण संख्या वाढलेली दिसणार आहे.

ज्या जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळून आला किंवा मृत्यू झाला, तो जिल्हा ऑनलाइनवर माहिती अपलोड करीत आहे. या ठिकाणचा रुग्ण असल्यास प्रतिबंधित क्षेत्र व इतर प्रकिया केली जाते. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अकोल्यातील मृत्यू संदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही किंवा पत्रव्यवहार झालेला नाही. औरंगाबाद आणि जालना येथे प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, असे बुलढाणा जिल्हाधिकारी  सुमन चंद्रा यांनी सांगितले आहे.