दयानंद लिपारे

कोल्हापूर लोकसभेच्या आखाडय़ात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकला असून प्रचाराला सुरुवातही केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक या दोन्ही उमेदवारांच्या  बाबतीत सुरुवातीलाच काही जमेच्या बाजू असताना तेढ वाढवणाऱ्या घटना घडत असल्याने राजकीय संघर्षांला जोर येणार याची चुणूक दिसत आहे.

मंडलिक यांच्या प्रचारात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग उत्साह वाढवणारा ठरला आहे, तर, आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा स्पष्टपणे निर्वाळा दिल्याने आणि पुतण्याला संसदेत पाठवण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपच्या कोषातून बाहेर पडून गाठीभेटी सुरू केल्याने महाडिक यांना मोठा राजकीय आधार ठरला आहे. याचवेळी खासदार महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वाक्युद्धाला नव्याने सुरुवात झाल्याने आघाडीत विघ्न निर्माण झाले आहे.

सतेज पाटील यांची विरोधाची मोहीम 

महाडिक यांनी शहरात प्रचाराला सुरुवात केली असताना त्यांचे कट्टर विरोधक आमदार  सतेज पाटील यांनी आघाडीधर्म न पाळणाऱ्यांना मते देऊ  नका, असे म्हणत विरोधाची मोहीम अधिकच जोरकस केली आहे. ‘महाडिक यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला गृहीत धरून भाजप हिताचे राजकारण केले असल्याने त्यांना मते देऊ  नका’, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. याचवेळी महाडिक यांनी पाटील यांच्या ‘कसबा बावडा भागाचा उल्लेख करून ‘हा भाग आपल्याकडेच असल्याच्या भ्रमात राहू नये ही कुणाची जहािगरी नाही,येथून गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील’,असे सांगत पाटील यांना आव्हान दिले आहे. मुश्रीफ यांनी महाडिक यांना समर्थन दिले असले तरी त्यांनी कागल तालुक्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांंच्या खाजगी बैठकीत खासदार महाडिक यांना विरोध दर्शवण्यात आला होता. यामुळे नेते एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे राहण्याचा धोका दिसत आहे.

शिवसेनेसाठी पालकमंत्री सक्रिय

संजय मंडलिक यांना महसूल मंत्री पाटील यांचे समर्थन मिळू लागल्याने त्यांना आधार मिळाला आहे. सोमवारी मुरगूड नगरपालिकेच्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी ‘महाडिक यांच्याशी मैत्री असली तरी युतीधर्मनुसार मंडलिक यांना खासदार करणार’ असे आश्वस्त केले. याच कार्यRमात युतीचा कागल तालुक्यातील आमदार सेनेचा की भाजपचा या वादावर तोडगा काढताना मंत्री पाटील यांनी ‘माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंघ घाटगे यापैकी एकास विधानसभा आणि दुसऱ्यास विधान परिषदेत निवडून आणले जाईल’, असे सांगितले आहे.

काका पुतण्याच्या पाठीशी

लोकसभा निवडणुकीच्या सलामीला काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी  घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पक्षातून मोठे काहूर उठले होते. आता ते काहीसे निवळू लागले असल्याचे आमदार मुश्रीफ यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.  महिला मेळाव्यात ‘महाडिक यांना पुन्हा खासदार करण्याची शपथ घेऊया’, असे आवाहन केले. पाठोपाठ, काका महादेवराव महाडिक यांनी गोकुळ दूध संघासह जिल्ह्य़ातील महाडिक गट पुतण्याच्या प्रचारात उतरवला आहे. स्वत: गाठीभेटींवर जोर दिला आहे. गेली चार वर्ष ते भाजपच्या, विशेषत: पालकमंत्री पाटील यांच्या कलाने भाजपाला पूरक राजकारण करत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाडिक यांनी भाजपच्या कोषातून बाहेर पडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. आता त्यांचे पुत्र, भाजपचे आमदार अमल आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  शौमिका महाडिक हेही घरच्या प्रचारात उतरणार का, याकडे लक्ष वेधले आहे. अर्थात, महादेवराव महाडिक यांच्या हालचाली पाहता घरात मतभेद निर्माण होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जाते.