पत्नीने २०० रुपये मागितल्याच्या कारणावरून झालेल्या झटापटीत अवघ्या चार महिन्याच्या बाळाला पतीने जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती दत्ता अनिल देशमुख याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी शुभांगी दत्ता देशमुख यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी शुभांगी दत्ता देशमुख (वय २८) हिने पती दत्ता अनिल देशमुख (वय ३४, दोघेही रा. बौद्ध नगर, पिंपरी रोड) याला २०० रुपये मागितले होते. याच कारणावरून दोघात भांडण झाले. रागाच्या भरात पती दत्ता याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटले. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशमुख कुटुंब हे भंगार गोळा करून मिळेल, त्या पैशात आपला संसार चालवतात. दत्ता देशमुख याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे संसाराचा गाडा पत्नी शुभांगी चालवते. त्यामुळेच त्याला पैसे मागितले होते, यातूनच ही धक्कादायक घटना घडली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मुंडे हे करत आहेत.