लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला  दिल्ली येथून वाशिम जिल्ह्यात दाखल झालेल्या महिलेचा करोना तपासणी अहवाल गुरुवारी सकारात्मक आला आहे. मध्य प्रदेशमधूनही एक करोनाबाधित युवती जिल्ह्यात कालच दाखल झाली.  नवी दिल्ली येथून कारंजा लाड तालुक्यातील दादगाव येथे परतलेल्या ३६ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलनासह पुढील कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

दादगाव हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, मध्य प्रदेश येथून २ जून रोजी रात्री वाशिम येथे आलेल्या करोनाबाधित युवतीला ३ जून रोजी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच तिच्या कुटुंबातील चार व एक वाहनचालक अशा पाच जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या युवतीचा वाशिम शहरात इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क आलेला नाही. या युवतीचे रेल्वेस्थानक परिसरातील निवासस्थान प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. वाशीम जिल्ह्यातून आतापर्यंत २८६ नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी एकूण १० सकारात्मक अहवाल आले. त्यातील सहा जणांना सुट्टी, दोन मृत्यू व दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २४१ अहवाल नकारात्मक आले. ३५ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.