अपघात झाल्यावर अनेकजण बघ्यांची भूमिका घेतात किंवा आपल्या फोनमध्ये फोटो टिपण्यासाठी दंग असतात. अनेकदा मदत वेळेवर न मिळाल्यानं त्यांचे प्राण जातात, पण त्या बघ्यांपैकी नाही, अपघातग्रस्तांच्या मदतीला त्या धावून जातात, त्यांचे प्राण वाचवतात वेळप्रसंगी अपघातात मृत्यू झालेल्यांचा मृतदेह उचलण्याचं कामही त्या करतात. अशा या महिलेचं पूर्ण नाव आहे शिवानी गणेश नाशे. काळेवाडी परिसरात त्या भाड्याच्या खोलीत राहतात.

कोणतंही काम छोटं मोठं नसतं म्हणूनच आपलं घर चालवण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी शिवानी यांची आहे. काहीवर्षांपूर्वी त्यांच्या पतीनं ४० हजारांचं कर्ज घेतलं होतं.  कर्ज फेडता येत नसल्यानं अनेकवेळा त्यांचे पतीशी वरचेवर खटके उडत होते. शेवटी पतीपासून विभक्त झाल्यानंतर कर्ज फेडण्याची जबाबदारी शिवानी यांच्यावर आली. परिस्थितीपुढे गुघडे टेकायचे नाही त्यांनी ठरवलं, सुरुवातीला पिंपरीतील रेल्वे स्थानकात कंत्राटपद्धतीनं झाडू मारण्याचे काम त्यांनी मिळवलं. त्यातून मिळणाऱ्या पाच हजारांच्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होत असल्यानं त्यांनी रेल्वे अपघातातील मृतदेह उचलण्यास सुरुवात केली.

रेल्वे अपघातात छिन्न विच्छिन्न झालेले मृतदेह त्यांनी न घाबरता उचलले कारण प्रश्न पोटापाण्याचा होता. गेल्या नऊ वर्षांपासून त्या मृतदेह उचलत आहेत. आतापर्यंत त्यांनी ४०० च्या वर मृतदेह उचलले आहेत. हे मृतदेह शवाघरात घेऊन जाण्याचं कामही त्या करतात. अनेकदा हे मृतदेह उचलण्याची अनेकजणांना भीती वाटते पण शिवानी यांच्या खांद्यावर त्यांच्या चार मुलांची जबाबदारी आहे. जर हे काम केलं नाही तर घर चालवणं अशक्य होईल याची जाणीव शिवानी यांना आहे म्हणूनच त्या हे काम करतात. या बदल्यात त्यांना १०० ते १५० रुपयांची मदत मिळते. त्या भाड्याच्या घरात राहात असल्यानं अडीच हजार रुपये भांड त्यांना मालकांना द्यावे लागते ,मात्र उरलेल्या पैशात त्या आपल्या चार मुलांचं शिक्षण भागवत आहेत. त्यांची चारही मुले ही बारामती येथील वसतिगृहात शिक्षण घेत आहेत. मी केवळ दुसरीपर्यंत शिकले पण माझ्या मुलांवर मात्र ही वेळ येऊ नये म्हणून त्या धडपडत आहेत.

कृष्णा पांचाळ,पिंपरी-चिंचवड.