बाजार समिती निवडणुकांच्या निमित्ताने झालेली राजकीय बांधणीही जिल्ह्यातील राजकारणात होत असलेल्या बदलाची नांदी असल्याचे मत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. काँग्रेस कार्यकत्रे दिवसभर कोठेही गेले तर पुन्हा संध्याकाळी दावणीला आल्यासारखे पुन्हा काँग्रेसकडेच येत असतात असेही त्यांनी सांगितले.
सांगलीची बाजार समिती ही मोठी संस्था असून या संस्थेचा कारभार चांगल्या पध्दतीने चालावा यासाठी लोकांना विश्वासात घेऊन पॅनेल तयार केले आहे. नव्या योजना आणून बाजार समिती सक्षम करणे आवश्यक आहे. यामुळेच महापालिकेप्रमाणे आपण बाजार समितीच्या निवडणुकीत पूर्ण लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य माणसांना उमेदवारी देऊन ताकद देण्याचे आणि आमच्यासोबत कोण येत असतील तर त्यांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार आहे. मंगळवारी कवठेमहांकाळ येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्यातील सरकारने लोकांची निराशा केली असून लोकांनी त्यांना चांगल्या कामाची शब्द दिल्याने सत्ता दिली आहे. मात्र अपेक्षाभंग होत असल्याने गोंदिया व भंडारा येथे बदल झाल्याचे दिसून आले असून ही परिवर्तनाची नांदी आहे असे त्यांनी सांगितले.