करोना संकटामूळे निवारा गृहाच्या आश्रयाला आलेल्या शेकडो मजूरांची उत्तम व्यवस्था झाली असली तरी काम नसल्याने अस्वस्थ असलेल्या या मजूर व कामगारांना जवळपास काम देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील विविध उद्योगात कार्यरत मजूरांनी लॉकडाउन नंतर गावाकडे पायपीट सुरू केली असतांनाच त्यांना स्वयंसेवी संघटनांनी प्रशासनाच्या मदतीने थांबण्याची विनंती केली. जवळपास सव्वादोन हजार या मजूरांना विविध धर्मशाळांच्या सौजन्याने आश्रय देण्यात आला. निवासानंतर भोजन व अन्य जबाबदाऱ्या होत्याच. त्यासाठी देणाऱ्यांचे हात हजार असा प्रत्यय प्रशासनाने अनुभवला. कंवरराम, बच्छराज धर्मशाळा, न्यू इंग्लिश हायस्कूल व अन्य ठिकाणी दोनही वेळेचे जेवण, नाष्टा, चहापाणी, मनोरंजानासाठी टिव्ही सेट, सायंकाळी गुरूदेव सेवा मंडळाची भजने, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, सॅनिटरी नॅपकिन्स, मोबाईल चार्जर, डास प्रतिबंधकं अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  यासाठी समाजातील सर्व घटकांनी हातभार लावला.

पहिल्या चार दिवसांत देणारे मिळण्यापूर्वी सचिन अग्निहोत्री, डॉ. सचिन पावडे व प्रदीप बजाज या समाजसेवींनी स्वबळावर सर्व सांभाळले. पूढे दत्ता मेघे कर्मचारी संघटना, पप्पू रिझवी, जावेद शेख, शिक्षण परिषद, यांनी जबाबदारी उचलली. बोहरा समाजाच्या महिलांनी स्त्री-पुरूष व मुलांना कपडे दिले. मनिष एंटरप्रायझेसच्या बलावाणी यांनी सर्व धर्मशाळेत टीव्ही संच उपलब्ध करून दिल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले. ओबीसी जनजागरण संघटनेने नाष्ट्याची जबाबदारी उचलली. अधिकारी व कर्मचारी संघटनेने मुलांसाठी खेळणी पुरवली. माजी सैनिक संघटनेने धर्मशाळेतील व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी उचलली आहे. प्रत्येक धर्मशाळेत दैनंदिन वैद्यकीय तपासणी केल्या जाते. मजूरांचे मुकादम राजकुमार बागरेख (बालाघाट) हे यासंदर्भात म्हणाले की, अशी व्यवस्था आम्ही आयुष्यात पाहली नसती. वर्धेकर देवासारखे धावले. आता पळून गेलेल्या आमच्या बांधवांना आम्ही परत येण्याची विनंती करत आहोत. काही दिवस काढू परत इथेच कामाला लागू, असे राजकुमार यांनी लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले.

अशी सर्व व्यवस्था असुनही हाताला काम नसल्याने बैचेन झालेल्या या मजूरांची स्थिती पाहून त्यांना आजपासून जवळपास काम देण्याची व्यवस्था करणार असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार म्हणाले. लगतच उमरी येथील बंद पडलेल्या जिनींगचे काम सुरू होईल. महिलांना कापूसगाठी वेचण्याचे काम मिळेल. या बंद अवस्थेत सर्व ती खबरदारी घेवून टप्याटप्याने काम देण्याची व्यवस्था होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसत्ताला सांगितले.