संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने शनिवार, २० फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या सभेस जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू असताना राज्यातील पहिली शेतकरी महापंचायत यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने या सभेची जय्यत तयारी येथील आझाद मैदानात केली जात होती. मात्र जिल्ह्यात करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सभेस परवानगी नाकारण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राकेश टिकैत महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची सुरूवात यवतमाळमधून करणार आहेत. त्यासाठी २० फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानात दुपारी ३ वाजता शेतकरी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांनी या सभेची तयारी सुरू केली होती. यवतमाळच्या या सभेतून सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील दाभडी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ‘चाच पे चर्चा’ या कार्यक्रमावर भाष्य करण्याची रणनिती शेतकरी नेत्यांनी आखली होती. या सभेसाठी किमान एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असे आयोजकांचे प्रयत्न होते.

या सभेस शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. सभेत करोनाच्या अनुषंगाने मास्क, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन होणार नाही, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या सभेस परवानगी नाकारण्यात यावी, असा अभिप्राय पोलीस अधीक्षकांनी प्रशासनास दिला. त्या आधारे राकेश टिकैत यांच्या सभेस परवानगी नाकारत असल्याचे आदेश जिल्हा प्रशासानाने गुरूवारी दुपारी काढले.

या आदेशामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त् केली. करोना संसर्गाच्या अनुषंगाने शासन, प्रशासनाने निर्गमित केलेले सर्व नियम, सूचना पाळून ही सभा घेण्याच्या हालचाली सुरू असून, सभेचे समाजमाध्यमांधून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. त्या दृष्टीने आयोजकांनी प्रशासनाकडे नव्याने परवानगी मागितली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिली. मात्र नवीन परवानगीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.