आ. वामनराव कासावारच कायम
महाराष्ट्रासह साऱ्या भारतातील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बदलले जातील, पण कितीही डोके आपटले तरी यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना मात्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण बदलणार नाहीत, याची खात्री झाली आहे, असा उद्वेगजनक संदेश कार्यकर्त्यांना देऊन विद्यमान अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांना आपण स्वीकारले पाहिजे. त्यांनीही जोमाने काम करावे, असे मत काही काँग्रेस नेत्यांनी ‘मन की बात’ कार्यकर्त्यांच्या बठकीत व्यक्त केल्याने पक्षांतर्गत गटबाजीचा पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी राज्यातील १३ जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर विदर्भातील नागपूर ग्रामीण, अकोला शहर, भंडारा आणि बुलढाणासह नांदेड, जालना, अशा सहा अध्यक्षांना बदलले आहे. यावेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आमदार कासावार यांनाही बदलण्याची प्रलंबित मागणी पूर्ण होईल, या काही नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. विशेष बाब ही की, यवतमाळात बदल होणार नाही, याची खात्री पटल्याने आठ दिवसापूर्वीच काँग्रेस मेळाव्यात काही नेते स्पष्टच म्हणाले होते की, कितीही डोके आपटले तरी यवतमाळ जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना मात्र प्रदेशाध्यक्ष बदलणार नाहीत, याची खात्री झाली आहे. तेव्हा विद्यमान अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांना आपण स्वीकारले पाहिजे व त्यांनीही जोमाने बिनधास्त होऊन काम करावे’. वामनराव कासावार बदलण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी मागणी केली होती. खुद्द कासावार यांनीही कंटाळून राजीनामा देण्याची तयारी दाखवून कोणालाही करा पण लवकर करा, अशी प्रदेशाध्यक्षांकडे अर्चना केली होती, पण माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे जैसे थे साठी अनुकूल असल्याने व त्यांच्या संमतीशिवाय जिल्हाध्यक्ष न बदलण्याचा दिल्लीश्वरांचा आदेश असल्याने १८ जिल्हाध्यक्ष बदलले तरी यवतमाळात मात्र बदल झाला नाही आणि त्याला कारण म्हणजे, पक्षांतर्गत गटबाजी होय, हे स्पष्ट आहे.
जिल्हा अध्यक्षपदाचा वाद सोडवावा, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना ११ जूनला ते उमरखेडला आले होते तेव्हा करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पुरता सफाया झालेला आहे. ७ पकी ५ आमदार भाजपचे, १ राष्ट्रवादी आणि १ सेनेचा आहे. अशा स्थितीत पक्ष बळकटीकरणासाठी जिल्हाध्यक्षांची निवड होणे गरजेचे आहे, असेही खासदार चव्हाण यांना सांगण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लावावी, यासाठी कांॅग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. विद्यमान अध्यक्ष वामनराव कासावार अत्यंत संयमी, हजरजबाबीपणा व विनोदबुध्दीसाठी ख्यात असूनही अध्यक्ष बदलाच्या चच्रेत सिंहाचा वाटा घेत असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली होती. अध्यक्षाला कार्यकारिणी जाहीर करू दिली जात नाही आणि त्यांचा राजीनामाही स्वीकृत होत नाही, अशा स्थितीत आपल्याला दोष देत दिल्लीश्वरांच्याजवळ नव्या अध्यक्षांसाठी फिल्डिंग लावत असल्याचा कासावारांचा आरोप असल्याची चर्चा होती. कुणालाही अध्यक्ष करा पण लवकर करा, असा मोघे यांचा आग्रह असला तरी कोणत्याही एका नावावर पक्षात एकमत होत नसल्याने जिल्हा अध्यक्ष बदलायचाच नाही, असा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घेतल्याचे वृत्त आहे.