यवतमाळात दोन दिवसात ६६ मिमी पाऊस

यवतमाळ : ऐन दिवाळीच्या सणात गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कापूस आणि सोयाबीनचे या पावसाने अतोनात नुकसान केले आहे. कधी नव्हे ती यावर्षी पीक परिस्थिती उत्तम असताना अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे उत्पादन पाण्यात गेले.

गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद झाली. वणी, मारेगाव, झरी, केळापूर हे तालुके वगळता इतर सर्वच भागात जोरदार पाऊ स झाला. या पावसाने खरीप पिकांसह फळबागा, भाजीपाला आणि फुलशेतीचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत हाताशी आलेले झेंडूचे पीक पावसामुळे अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारात व्यापारी झेंडूची फुलं उतरवून घ्यायलाही तयार नव्हते. त्यामुळे फूल उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले.

जिल्ह्यात कापसाचा सर्वाधिक पाच लाख हेक्टरवर पेरा आहे तर दोन लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. यावर्षी प्रारंभी पावसाने विलंब केल्याने अनेकांनी उशिरा पेरणी केली. दरम्यानच्या काळात पिकांना आवश्यक असलेल्या प्रमाणात पाऊ स झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची खात्री होती. मात्र दसऱ्यापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. साधारण दसऱ्यानंतर सोयाबीन काढले जाते. यावेळी दसऱ्यानंतर विधानसभा निवडणूक आल्याने सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळणेही दुरापास्त झाले होते. जिल्ह्यात अद्यापही सव्वा लाख हेक्टरवरील सोयाबीनची कापणी व्हायची आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊ स कोसळत असल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीन, कापून त्याची थप्पी मारून ठेवली, तर काही शेतांमध्ये सोयाबीन कापणी करून तसेच पडून असल्याने पावसाने या सोयाबीनला कोंब फुटून ते सडण्याची भीती व्यक्त होते आहे. सोयाबीन भिजल्याने त्याचा दरही पडला आहे. कापसाचेही प्रचंड नुकसान पावसामुळे झाले आहे. बहुतांश शेतात कापसाचे बोंडं फुलले असून कापूस फुटला आहे. पावसामुळे हा कापूसही झाडावरच भिजल्याने त्याची प्रत घसरली आहे. अनेक शेतात कापसाचे झाडं जमिनीवर आडवे पडले आहेत. सोयाबीन आणि कापसाचे हातातले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दिवाळीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप व्हायचे आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांनी विम्याच्या दाव्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी पंकज बरडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.