भोंदू बाबांप्रमाणे वक्तव्य करणाऱ्या रामदेवबाबांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद शाखेने मुख्यमंत्र्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत निवेदन देण्यात आले. योग सोडून रामदेवबाबांनी सत्तेचे राजकारण करू नये असेही निवेदनात म्हटले आहे.
रामदेवबाबांच्या वक्तव्याचा निषेध करीत अंनिसने निवेदनात म्हटले आहे की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची पायमल्ली करून मनुवादी संस्कृतीचे बीभत्स प्रदर्शन करीत रामदेव बाबा समाजाची दिशाभूल करीत आहेत. समाजाला फसविणाऱ्या भोंदू बाबाची जागा या बाबांनी घेतली आहे. दलित महिलांच्या व पुरोगामित्वाचा वारसा जपणाऱ्या प्रत्येकाच्या भावनांना कुत्सित विचारांनी जखडण्याचे, हीन लेखणारे भाष्य रामदेवबाबा यांनी केले. योग सोडून सत्तेचे राजकारण करणाऱ्या रामदेवबाबा यांचा निवेदनात तीव्र निषेध नोंदविला आहे. निवेदनावर अंनिसचे जिल्हाध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सचिव बालाजी तांबे, राष्ट्रीय सेवादलाचे अॅड. देविदास वडगावकर, जिजाऊ जयंती समितीचे प्रा. भालचंद्र जाधव, भीमशक्ती संघटनेच्या अॅड. ज्योती बडेकर, सुधाकर माळाळे, अनिल काळे, जिल्हा पत्रकार संघटनेचे सचिव रवींद्र केसकर आदींसह २३ जणांच्या सह्य़ा आहेत.