युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु असून आदित्य ठाकरे यांनी सोलापुरात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनके प्रश्नांना उत्तरं दिली. वालचंद कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमात यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरे यांना खेकड्यांमुळे खरंच धरण फुटू शकतं का ? असा प्रश्न केला. विशेष म्हणजे यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंतदेखील उपस्थित होते.

विद्यार्थ्याने आदित्य ठाकरे यांना विचारलं की, काहीजण म्हणतात खेकड्यांमुळे धरणं फुटू शकतं तर काहीजण नाही म्हणतात मला तुमच्याकडून सत्य जाणून घ्यायचं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्याला तुम्ही कोणता विषय शिकत आहात असं विचारलं. यावर विद्यार्थ्याने कॉमर्स असं उत्तर दिलं.

यानंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “हा प्रश्न तुम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विचारला पाहिजे. धरण हे झीज झाल्याने फुटतं. तुम्ही एखादा दगड घेतलात आणि त्यावर पाण्याची लाट मारत राहिलात तर झीज होते. हाताने गाल खाजवला तरी रक्त येतं. त्यामुळे खेकड्यांमुळे धरण फुटलं असं तेथील गावकऱ्यांना वाटलं असं होऊ शकतं. इतर काही धरणं आहेत तिथे अशी समस्या निर्माण होऊ शकते का ? यावर काम सुरु आहे”. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्यांनी गावकऱ्यांचा हवाला देत समर्थन केलं का ? असा प्रश्न विचारला जात आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपण इतर धरणांवर लक्ष देणं गरजेचं आहे. धरणांची संख्या वाढवली पाहिजे असंही सांगितलं.

(बाईट २२.१६ व्या मिनिटाला ऐकू शकता)

काय बोलले होते तानाजी सावंत ?
खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.