विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले. पुण्याचे आठ आमदार आता शहराचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतील. या आमदारांची राजकीय ओळख तर पुणेकरांना आहेच; पण त्या पलीकडे असलेली त्यांची वेगळी ओळख काय आहे.. या बद्दल वाचू या त्यांच्याच शब्दांत..

(कुटुंबाची साथ मोलाची! : पर्वती;माधुरी मिसाळ)

odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
Sharad Pawar will contest the election from Baramati know what is exactly matter
बारामतीमधून ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात…जाणून घ्या काय आहे प्रकार?
Kolhapur, Kolhapur Lok Sabha,
प्रचार लोकसभेचा पण मशागत विधानसभेची
narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा

राजकारणात येऊन आता पंधरासोळा वर्ष झाली, त्यामुळे या काळात मी राजकारण या करिअरला सरावले असं म्हणायला हरकत नाही. मात्र, राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसताना अपघातानेच राजकारणात आले. माझे पती गेले त्यानंतर राजकारणात त्यांचा वारसा चालवणं ही त्या वेळी गरज होती, पण राजकीय पाश्र्वभूमी शून्य होती. त्यामुळे पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो तसं मी राजकारणात आले आणि शिकले. माझे दीर, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांची त्या काळात खूप मदत झाली, हे मान्य केलंच पाहिजे.

मुलं लहान असताना राजकारणात करिअर म्हणजे तारेवरची कसरत होती, पण मुलांना स्वावलंबी बनवण्याची हीच संधी आहे असं मानून मी त्यांना घडवलं. मुळातच माझा स्वभाव धाडसी आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाणं मला महत्त्वाचं वाटतं. घर चालवणं ही फक्त महिलेची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. माझं कुटुंबही याच विचारांचं असल्यामुळे माझा प्रवास सोपा झाला. प्रवास करणं, मुलांबरोबर चित्रपट पाहाणं या गोष्टी मला आवडतात. माझा दिवस सकाळी सात वाजता सुरू होतो. या दिनक्रमात शक्य असेल तेव्हा मुलांबरोबर त्यांनी आखलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न मी करते. माझे कार्यकर्ते, मतदार, मतदारसंघ यांच्याशी देखील असेच कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध मी जोपासले आहेत. त्यामुळे उत्साहाने काम करण्यासाठी त्याची मदत होते.

(वाचन, गॅझेट्स, इंग्रजी चित्रपटांसह खवय्येगिरीत रमतो.. ,हडपसर; चेतन तुपे)

माझे वडील विठ्ठल तुपे यांच्यामुळे आमच्या घरातच राजकारण होतं. मात्र, आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्हाला राजकारणाचा वारा लागणार नाही, याची पुरेपूर खबरदारी आई-वडिलांनी घेतली. प्रख्यात नूमवि शाळेत माझं शालेय शिक्षण झालं. भारती विद्यापीठातून बी. ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. घरी आई-वडील दोघेही दर्जेदार शिक्षणाबाबत आग्रही होते. इंजिनिअरिंगला असताना विद्यापीठात बेस्ट स्टुडंटचं पारितोषिक मी पटकावलं होतं. योगायोग म्हणजे माझे वडील आमदार विठ्ठल तुपे यांच्या हस्ते मला हे पारितोषिक मिळालं. विद्यापीठातील अनेकांना आमदार विठ्ठल तुपे यांचा मी मुलगा आहे हे त्या दिवशी प्रथमच समजलं.

स्थापत्य अभियंता म्हणून काम करत असताना घरात राजकारणावर चर्चा होत त्या मी ऐकत असे, मात्र स्वत: राजकारणात जावं असा विचार नव्हता. वडिलांच्या निधनानंतर मात्र कार्यकर्ते आणि कुटुंबीयांच्या आग्रहातून सक्रिय राजकारणात आलो. मात्र राजकारणापलिकडे अनेक गोष्टींमध्ये मला रस वाटतो. ‘स्टारवॉर’ या तरुण पिढीच्या आवडत्या ‘सायन्स-फिक्शन’ प्रकारातल्या चित्रपटांचा, हॉलिवूडपटांचा मी चाहता आहे.

माझ्या वैयक्तिक ग्रंथालयात हजारो पुस्तकं आहेत, ती सगळी मी वाचलेली आहेत. उर्दू भाषेवरच्या प्रेमातून मी तीही आत्मसात केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान, नवीन गॅझेट्स वापरून पाहाणे, त्यांचा उपयोग दैनंदिन जगण्यात करून घेता येतो का हे पाहाणं मला आवडतं. त्यामुळे तरुण पिढीशी माझे सूर उत्तम जुळतात. मी जातीचा खवय्या आहे. वेगवेगळ्या चवींचे खाद्यपदार्थ चाखायला, स्वयंपाक घरात निरनिराळे प्रयोग करून पाहायला मला आवडतात. राजकारण म्हटलं की दिनक्रम व्यस्त असतो, मात्र वाचन, चित्रपट, गॅझेट्स आणि खवय्येगिरी या गोष्टी माझ्यासाठी ‘स्ट्रेस बस्टर’ सारखं काम करतात.

(प्रवास, वाचन, लेखन आणि पुष्परचनेचाही छंद , कसबा : मुक्ता टिळक)

माहेरच्या कुटुंबात राजकारणाची काहीच पाश्र्वभूमी नव्हती, त्यामुळे इतर सर्वसाधारण मुलींप्रमाणे शिक्षण, नोकरी, लग्न असाच प्रवास झाला. व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अनेक मोठमोठय़ा कंपन्यांसाठी काम केलं. आवड म्हणून परदेशी भाषा, पत्रकारिता यांचाही अभ्यास  केला. हे करताना पुढे मी राजकारणात जाईन असा साधा विचारही मी केला नव्हता. लग्न होऊन टिळक कुटुंबात आले आणि राजकारणात जाण्याची संधी देखील मिळाली. करून बघावं या विचारातून या प्रवाहात पडले आणि माझ्या करिअरची दिशा बदलून गेली. टिळक कुटुंबातील असल्याने टिळक हा वारसा जपत त्याला धक्का न लावता राजकारणात कार्यरत राहाणे ही एक जबाबदारीच आहे असे मी मानते.

राजकारणापलिकडे अनेक छंद आणि आवडीनिवडी आहेत, त्या जोपासण्याचा प्रयत्न मी आवर्जून करते. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, शक्यतो तो घरातच जिरवा असं पुणेकरांना आम्ही सांगतो. पण ही सुरुवात मी अनेक वर्षांपूर्वी केली आणि घराच्या गच्चीत ओल्या कचऱ्याच्या खतातून बाग फुलवली. जपानी पुष्परचना प्रकार इकेबाना याचीही मला आवड आहे. त्या बनवण्याचा अभ्यासक्रम मी केला आहे. पूर्वी बॅडमिंटन खेळत होते. प्रवास, वाचन, लेखन यांची आवड सुद्धा प्रयत्नपूर्वक जोपासते. प्रवासादरम्यान स्थानिक ठिकाणं बघणं, लोकांना भेटून त्यांचं जगणं समजून घेणं, तेथील वैशिष्टय़पूर्ण गोष्टी खरेदी करणं आवडतं. राजकारणातील चढउतारांवर मात करून नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात.

(मी कार्यकर्त्यांच्याच भूमिकेत खडकवासला : भीमराव तापकीर)

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेला सकारात्मक दृष्टिकोन, विनम्रता, मतदारसंघामध्ये असलेले नाते-गोते आणि भाजपने केलेली विकासकामे याच्या बळावर माझा विजय झाला. अटीतटीची निवडणूक होऊन पारडे खाली-वर होत गेले तरी विजय माझाच होणार याची पक्की खूणगाठ बांधली होती आणि तसेच झाले.

आमचे तापकीर घराणे मूळचे काँग्रेसचे. धनकवडी येथे वास्तव्य करताना पाचही भाऊ समाजकारणामध्ये आहोत. ज्येष्ठ बंधू अर्जुन तापकीर यांनी धनकवडी ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषविलं होतं. धनकवडी भागात भारतीय जनता पक्षाचे काम करणारे दिगंबर डवरी आणि भानुदास वट्टमवार यांच्याशी संपर्क आला.

त्यांच्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला. २००२ मध्ये प्रभाग रचनेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. २००७ मध्ये पुन्हा एकदा माझा विजय झाला.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात २०११ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाने मला उमेदवारी दिली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ दिल्यामुळे माझा विजय झाला. संयमशील वृत्ती आणि मतदारांसाठी सदैव उपलब्ध राहणारा कार्यकर्ता याच्या बळावर २०१४ मध्ये दिलीप बराटे, तर आता २०१९ मध्ये सचिन दोडके या राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात विजय संपादन करणं सुलभ झालं.

 

(राजकारणाचे बाळकडू घरातूनच; वडगावशेरी  : सुनील टिंगरे)

शिक्षण आणि व्यवसायामध्ये यश संपादन केल्यानंतर लोकांची कामं करावीत या उद्देशातून मी राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायामुळे लोकांशी संपर्क येत असला तरी त्याचं स्वरूप मर्यादित होतं. समाजसेवेचं एक व्यापक क्षेत्र मला खुणावत होतं. अधिकाधिक लोकांची कामं करता यावीत यासाठी मी राजकारणात आलो. मला प्रवास आणि वाचनाचा छंद आहे. ऐतिहासिक, चरित्र-आत्मचरित्र आणि वैचारिक स्वरूपाचं वाचन करायला मला आवडतं.

माझे आजोबा बाळासाहेब टिंगरे धानोरी ग्रामपंचायतीचे सरपंच होते, तर वडील विजय टिंगरे टिंगरेनगर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले, पण आधी शिक्षण घेतलेच पाहिजे हा घरच्यांचा आग्रह होता. त्यामुळे भारती विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका संपादन केली. बांधकाम क्षेत्रात प्रवेश करून यशस्वी उद्योजक म्हणून वाटचाल सुरू केली. २००७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक झालो. मात्र, २०१२ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे मी अपक्ष लढलो. थोडक्या मतांनी मला अपयशाला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मला शिवसेनेने उमेदवारी दिली. अगदी थोडय़ा मतांच्या फरकाने माझा पराभव झाला. त्यानंतर अजित पवार यांनी २०१७ मध्ये पक्षात घेऊन मला नगरसेवकपदाची संधी दिली. दोन वर्षांतच विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारी दिली.

गेल्या वेळी झालेल्या पराभवाची मतदारांनाच रुखरुख लागली होती. त्यामुळे सत्ता आणि संपत्तीवाल्या उमेदवाराला दूर करून मला विधानसभेमध्ये पाठवायचं हे मतदारांनी ठरविलं होतं. त्याची प्रचिती मला निकालानंतर आली.

 

(मित्रपरिवार हीच माझी आवड! कोथरूड :  चंद्रकांत पाटील)

मुंबईतल्या रे रोड परिसरात माझं बालपण गेलं. दहा बाय बाराच्या खोलीत, अत्यंत साध्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आई गृहिणी, वडील एका कंपनीत चहा वाटणारे किटली बॉय, त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाची कुठलीही पाश्र्वभूमी नव्हतीच. पण मुंबईत राहिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत असत, त्यांच्याशी संवाद साधायची कला मला अवगत होत गेली आणि त्यातून व्यसन लागलं ते माणसांचंच होतं, माझं ते व्यसन आजही कायम आहे, असं म्हणायला हरकत नाही.

पुढे तेरा वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जबाबदारी.. पुढे संघाच्या आदेशाने सक्रिय राजकारण यामुळे मी सदैव व्यस्त होतो. पदवीधर मतदार संघाचा आमदार होईपर्यंतच्या काळात कोल्हापूर जिल्ह्य़ातील खानापूर या गावी मी काजू प्रक्रिया उद्योग चालवला. टेलिमॅटिक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या जबलपूर स्थित कंपनीचा संचालक म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये कंपनीचा विस्तार केला.

या दरम्यान चित्रपट आणि वाचन या माझ्या आवडीच्या गोष्टी होत्या. कोल्हापुरात अनेकदा फर्स्ट डे फर्स्ट शो चित्रपट देखील मी पाहिले आहेत, पण राजकारणात जबाबदाऱ्या वाढल्या तशी ही आवड मागे पडली.

प्रवासात वेळ मिळेल, तेव्हा वाचनाची आवड मात्र आवर्जून जपतो. पत्नी अंजली हिची देखील विद्यार्थी परिषदेची पाश्र्वभूमी असल्यामुळे तिनं माझं सदैव व्यस्त असणं समजून घेतलं. खाण्यापिण्याच्या विशिष्ट आवडीनिवडी नाहीत. आइस्क्रीम, मक्याचे पदार्थ आवडतात, मात्र मधुमेह असल्यामुळे आता आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. राजकारण, त्यातली दगदग आणि व्यस्तता यांमुळे प्रकृतीची काळजी कटाक्षाने घेतो.

 

(लोहियानगर ५४ एच. पी. रूम नं. फ३ पुणे कॅन्टोन्मेंट :  सुनील कांबळे)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांच्या मुशीतून झोपडपट्टी भागात राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचं जीवन घडलं. वडीलबंधू दिलीप कांबळे यांच्याप्रमाणेच समाजकारणात काम करताना मला राजकारणात काम करण्याची संधी लाभली. चार वेळा नगरसेवकपद आणि आता स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषविताना अचानक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्याच्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

लोहियानगर झोपडपट्टीतील ५४ एच. पी. रूम नं. १३ हा आमचा पत्ता. वडील ज्ञानदेव कांबळे संघ स्वयंसेवक होते. त्यामुळे आम्हा पाचही भावांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. महात्मा फुलेनगर शाखेचे स्वयंसेवक या नात्याने संघाचा प्रसार आणि प्रचार केला. १९८५ मध्ये बंधू दिलीप कांबळे यांना महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळाले होते. त्यावेळी हिरामण कांबळे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दिलीप कांबळे यांच्यासह कांबळे आडनावाचे चार उमेदवार िरगणात होते. रमेश कांबळे हे अपक्ष उमेदवार निवडून आले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप कांबळे आमदार झाले आणि भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्यांना समाजकल्याण राज्य मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली होती. त्या काळात माझे राजकीय शिक्षण झाले.

आंबेडकरनगर झोपडपट्टी भागातून १९९७ मध्ये मी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. काही कारणांमुळे २००२ मध्ये मला तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र, नाऊमेद न होता मी पक्षाचं काम सुरू ठेवलं. २००७ पासून सलग तीन वेळा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. पाच वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालखंडात दिलीप कांबळे यांना पुन्हा एकदा सामाजिक न्याय राज्य मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. माझ्याकडे स्थायी समितीचं अध्यक्षपद असताना पक्षाने अचानक दिलीप कांबळे यांच्याऐवजी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केली. दांडगा जनसंपर्क, प्रचारकाच्या नात्याने लोकांमध्ये रमणारा कार्यकर्ता या माझ्या स्वभावाचा फायदा झाल्याने अटीतटीच्या लढतीमध्येही माझा विजय सुकर झाला.

 

(राजकारणाइतकाच कला, क्रीडा क्षेत्रातही सक्रिय शिवाजीनगर; सिद्धार्थ शिरोळे)

नगरसेवक, ‘पीएमपीएमएल’चा संचालक आणि आता नवनिर्वाचित आमदार अशी माझी ओळख असली तरी लेखन, प्रवास, छायाचित्रण, संगीत श्रवण हे माझे आवडते छंद आहेत. राजकारण आणि समाजकारणाच्या व्यापातून या छंदासाठी मी आवर्जून वेळ देतो. एवढेच नव्हे तर, दररोज सकाळी व्यायामशाळेत जाऊन शारीरिक तंदुरुस्तीकडेही जाणीवपूर्वक लक्ष देतो. स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून मी कला आणि क्रीडा क्षेत्रातही कार्यरत आहे.

माजी खासदार अनिल शिरोळे यांचा पुत्र एवढय़ापुरतीच माझी ओळख मर्यादित नाही. वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय पुढे नेताना नावाजलेल्या शबरी या हॉटेलचं व्यवस्थापन मी यशस्वीपणे सांभाळलं. या अनुभवातून मी स्वत:चं शर्वरी रेस्टॉरंट सुरू केलं. मात्र व्यवसायापेक्षा माझा कल समाजकारणात आहे हे ध्यानात आल्यानंतर मी पूर्ण वेळ समाजकारण आणि राजकारणात काम करण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत डेक्कन-मॉडेल कॉलनी प्रभागातून नगरसेवक म्हणून मी निवडून आलो. प्रभागातील वाहतूक आणि कचरा हे प्रश्न सोडविण्यावर मी भर दिला आहे. घोले रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या उद्देशातून या भागात सुरू केलेला चक्राकार वाहतुकीचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. पीएमपीएमएलचा संचालक म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा आणि इलेक्ट्रिक बस सेवा यांवर भर देत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न केले.

विद्या भवन स्कूलमधील शालेय शिक्षण, फग्र्युसन महाविद्यालयामधून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी बी. ई मेकॅनिकलची पदवी घेतली. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचा उपाध्यक्ष या नात्याने मी अमेरिका सरकारच्या प्रतिष्ठेच्या इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्रॅममध्ये सहभागी झालो होतो. मी लिहिलेल्या ‘टू डे इज माय फेव्हरेट डे’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद झाला आहे.

शब्दांकन : भक्ती बिसुरे, विद्याधर कुलकर्णी