सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकण्यात आले असल्याचं सांगत भाजपाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसंच मला, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना सोबत घेतलं असतं तर पक्षाच्या किमान २५ जागा वाढल्या असत्या असा दावाही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. “पक्षाचा विस्तार करण्यासाठी झटलेल्या माझ्यासारख्या नेत्याला हेतूपुरस्पर बाजूला ठेवण्याचं कारण काय?,” अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

“२०१४ मध्ये एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय माझा नव्हता तर दिल्लीतून आला होता. विरोधीपक्ष नेता म्हणून ते जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सहा महिन्यांनी चूक दुरुस्त करत सेना-भाजप सरकारमध्ये एकत्र आले. पण त्यानंतर एक वेगळंच चित्र निर्माण करण्यात आलं. दुर्दैवाने मुख्यमंत्रिपदावरुन एकमत न झाल्याने यावेळी शिवेसेना भाजपा वेगळे झाले,” अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

“माझं वैयक्तिक मत आहे की, भाजपाने अजित पवार यांचा पाठिंबा नको घ्यायला हवा होता. एका मोठ्या सिंचन घोटाळ्यात ते आरोपी आहेत, तसंच त्यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यामुळे त्यांच्याशी युती करायला नको होती,” असंही यावेली एकनाथ खडसे यांनी सांगितलं. सिंचन घोटाळ्यांच्या पुराव्यांसंबंधी बोलताना एकनाथ खडसे यांनी, बैलगाडीभर पुरावे तेव्हाच रद्दीत जमा झाले असल्याचं सांगितलं.

“माझ्यासहित विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना तिकीट दिलं नाही. निश्चितच पक्षाला याचा फटका बसला. आम्हाला सक्रीय राजकारणात सहभाग करुन घेतला असता तर २५ जागा वाढल्या असत्या,” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.