राज्यात महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत. मला अजित पवार यांनी ‘चंपा’ म्हटले, त्यावर राज्यात चर्चा झाली. ही चर्चा थांबत नाही तोच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चंपा म्हटले. असो, पण राज ठाकरे यांनी दुसर काही तरी बोलण्याची आवश्यकता होती.  माझी आई देखील मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते, तर हे सर्व विरोधक प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात. अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि  राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. तर ,आम्ही देखील त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकतो. पण आमची संस्कृती तशी नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील भाजपा व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा पार पडली, यावेळी चंद्रकांत पाटील  बोलत होते. याप्रसंगी  केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहर अध्यक्षा व विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक तसेच शहरातील महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात माझ्या उमेदवारीवरून अनेकवेळा चर्चा झाली. पण याच दरम्यान मला अजित पवार यांच्याकडून चंपा म्हटले गेले, त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील तसेच म्हटले. यातून शरद पवार साहेब सांगतील त्याप्रमाणे ते बोलणार हेच पुन्हा सिद्ध झाल्याचे सांगत, राज ठाकरे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मागील कित्येक वर्षांपासून परिचय आहे व ते चांगले व्यक्ती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.