विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारासाठी येणार आहेत. ते महाराष्ट्रात दोन दिवस तर हरियाणामध्ये एक दिवस प्रचार करणार आहेत. राहुल गांधी हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असून आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकदीनीशी लढवू असं मत काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी व्यक्त केलं.

राहुल गांधी हे 13 आणि 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रचारसभा घेणार आहेत. 13 आणि 13 ऑक्टोबर रोजी ते प्रत्येकी 3 प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे. कोणत्या ठिकाणी या सभा घेण्यात येणार आहेत, यावर सध्या पक्ष विचार करत आहे. परंतु महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत या सभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल गांधी यांचं नाव असूनही ते निवडणूक प्रचारापासून दूर राहू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. परंतु आता त्यांना पूर्ण विराम मिळाला आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे काँग्रेस भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त करत असली तरी काँग्रेसच्या नेतृत्वाने मात्र प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत नाही. तर स्टार प्रचारक मानले जाणारे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अद्याप महाराष्ट्रातील एकाही रॅलीला संबोधित केलं नाही. सध्या प्रचाराची जबाबदारी केवळ राज्यातल्याच नेत्यांच्या खांद्यावर आहे.