विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कोथरूड मतदार संघातून भाजपाकडून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्यापासून, चंद्रकांतदादांना स्थानिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. बाहेरचा उमदेवार नको स्थानिकचं हवा, अशी मतदारसंघातून मागणी सातत्याने पुढे येत आहे. स्थानिकांकडून होत असलेल्या या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी मी पुण्याचाच आहे, मी कुठला बाहेरचा नाही, असे म्हणत पुणेकरांच्या प्रश्नांची मला जाणीव असल्याचेही सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी बाहेरचा आहे असे काहीजण प्रचार करत आहेत, मात्र हे सर्वसामान्यांचे मत नाही. कारण मी पुणे पदवीधर मतदारसंघाचा मागील १२ वर्षांपासून आमदार आहे. पाच जिल्ह्यांमधील सहा लाख पदवीधरांचं मी प्रतिनिधीत्व करत असताना, या मतदारसंघातून माझ्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. मतदारसंघातील सगळ्या ठिकाणी माझी कार्यालयं, माझी माणसं आहेत. ते सर्वांचे ते प्रश्न समजून घेत आहेत व माझ्या पर्यंत पोहचवत आहेत. मी देखील सर्व प्रश्न मार्गी लावत आहे. सहज कोणासाठीही उपलब्ध असणारा, अशीच माझी ख्याती आहे. मी १९८२ पासून भारतीय जनात पक्षासाठी महाराष्ट्राचं काम करतो आहे, तेव्हापासून माझा पुण्याशी सातत्याने संबंध आहे. मी पुण्याचा पालकमंत्री आहे, पदवीधर मतदार संघाचा आमदार आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रश्नांची पूर्णपणे मला जाणीव आहे. येथील प्रश्न सोडवण्यात मला आनंद आहे. मी पुण्याचाच आहे मी कुठला बाहेरचा नाही. असे त्यांनी सांगितले.

राज्यात आठवडाभरापासून कोथरूड विधानसभा मतदारसंघ चर्चेत असून, या मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे असून त्यांना महाआघाडीकडून पाठिंबा देण्यात आला आहे. याशिवाय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे हे देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे या ठिकाणी तिहेरी लढत होणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. अद्याप उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख बाकी आहे.