“वारसदार कुणी व्यक्ती ठरवत नाही लोक ठरवत असतात. लोक जेव्हा मला पवारांचा वारसदार म्हणून संबोधित करतात तेव्हा मला आनंद होतो. पण आनंद होत असतानाच एक मोठी जबाबदारीही आपल्यावर आहे याची जाणीव होते,” असं मत कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांचे वारसदार म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते यावर भाष्य करताना रोहित यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. विजयानंतर रोहित यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील स्मृती स्थळाला भेट दिली.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार विजयी झाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निटकटवर्तीय राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित हे ४३ हजार ३४७ मतांनी निवडून आले. त्यानंतर ते शुक्रवारी साताऱ्यामध्ये गेले होते. यावेळेस त्यांनी एका खासगी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शरद पवार यांचे वारस म्हणून पाहिले जाते याचा आनंद वाटतो पण जबाबदारीही तितकीच आहे असं मत यावेळी रोहित यांनी व्यक्त केलं. “वारसदार कुणी व्यक्ती ठरवत नाही लोक ठरवत असतात. पण आज मी शिकतोय शेवटपर्यंत शिकत राहणार. पवारांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतोय. त्यांच्या शिकवणीखाली काम करतोय. लोक जेव्हा मला पवारांचा वारसदार म्हणून संबोधित करतात तेव्हा मला आनंद होतो. पण आनंद होत असतानाच एक मोठी जबाबदारीही आपल्यावर आहे याची जाणीव होते. आम्हाला अजून काम खूप करायेच आहे. आज पवारांच्या केवळ पाच ते सात टक्के आहोत. त्यांच्यासारखं होण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागेल. पण त्यांचा विचार ताकदीने जास्तीत जास्त लोकांपर्यत, तरुण पिढीपर्यंत कसा नेता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहणार आहोत. सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्यासाठी शेवटपर्यंत झटायचं ही शिकवण पवारांनी दिली आहे. हीच शिकवण आम्ही लहानपणीपासून जोपासत आलो आहोत. पुढेही आम्ही असंच काम करत राहणार आहोत,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

विजयाच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्यामध्ये येण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केलं. “यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ हे संपूर्ण राज्याला प्रेरणा देणारे स्थळ आहे. मी जिल्हा परिषदेची लढत जिंकलो होतो तेव्हाही या ठिकाणी आलो होतो. त्यामुळेच विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मी दर्शन आणि प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे,” असं रोहित यांनी सांगितलं.