पुण्यामधील कोथरुड मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोथरुडमधून भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता मनसे विरुद्ध चंद्रकांतदादा असा शाब्दिक बाचाबाचीचा सामना रंगताना दिसत आहे. यामध्ये आता मनसेचे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी ‘शांताबाई’ या गाण्याच्या चालीवर ‘चंपा दाजी’ हे गाणे तयार केले आहे. मनसे अधिकृत वृत्तांत या फेसबुक पेजवरुन हे गाणे शेअर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकारपरिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज यांनाही दोन ते तीन सभांमध्ये चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केला. “माझी आई देखील मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते, तर हे सर्व विरोधक प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात” अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच ‘अजित पवार यांनी मला चंपा म्हटल्यानंतर राज यांनी मला काहीतरी वेगळे नाव ठेवायला हवं होतं,’ असं मत नोंदवलं. आम्ही देखील त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकतो. पण आमची संस्कृती तशी नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. असं असलं तरी आता मनसेने थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर गाणं तयार केलं आहे.

या गाण्यामधून चंद्रकांत पाटील हे मूळचे कोथरुडचे नसून ते पुरातून वाहून आल्याची टीका मनसेने केली आहे. तसेच सत्तेची लालच असल्याने ते सांगली कोल्हापूर विसरुन कोथरुडमध्ये आले आहेत. फुकटची आश्वासने देणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यामुळे स्थानिकांची दांडी भाजपाने उडवली असल्याची टीका मनसेने या गाण्यामधून केली आहे. या गाण्याचे शब्द खालीलप्रमाणे…

चंपा दाजी,
पुरातून आला, डोईजड झाला
कोथरुडच्या अचानक प्रेमात पडला
अचानक भयानक प्रकार घडला.
सत्तेचा लालची वाहत आला
सांगली-कोल्हापूर विसरुन गेला

पाहुणा आलाय नवा नवा
आता चालणारा नाही त्याची हवा
कुठं शोधायचा लावून दिवा
सांगा विकास करणार आता कवा

हेलिकॅप्टरने गावभर फिरतो
विजयाची आस मनात धरतो
आश्वासनं बघा फुकटची देतो
स्थानिकांची दांडी उडवतो

मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे त्यामुळेच ही लढत रंगतदार होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns slams chandrakant patil by making song on tune of shantabai shantabai song scsg
First published on: 18-10-2019 at 15:37 IST