|| विकास महाडिक

दहा वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत बेलापूर हा तीन लाख ८८ हजार मतदारसंख्या असलेला स्वतंत्र मतदारसंघ झाला आहे. दोन वर्षांत या मतदारसंघाने दोन नवीन आमदारांना संधी दिलेली आहे. सुज्ञ, सुशिक्षित, समंजस असलेला हा मतदारसंघ पुनरावृत्ती करीत नाही असे दिसून येते.

सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या या मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत मतदारांनी माजी मंत्री व नवी मुंबईतील एक वजनदार नेतृत्व गणेश नाईक यांना संधी दिली तर पाच वर्षांनी त्याच नाईकांना या मतदारांनी घरी बसविले. राष्ट्रवादीतून नाईकांच्या जाचाला कंटाळून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव केला. या चुरशीत शिवसेनेचे विजय नाहटा हे तिसऱ्या क्रमांकावर होते.

९६ टक्के सुशिक्षित मतदारांपैकी अर्धे मतदार मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे तीन लाख ८८ हजार मतदारांपैकी केवळ दोन लाखांपर्यंतचे मतदार येथील उमेदवाराचे भवितव्य ठरवीत आहेत.

राज्यात महायुती झाल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी कायम राहिला आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी चुरशीच्या उमेदवार शर्यतीत बाजी मारली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी इच्छुक उमेदवार विजय नाहटा हे गेले अनेक महिने देव पाण्यात ठेवून होते. भाजपच्या वाटय़ाला हा मतदारसंघ गेल्यास वेळप्रसंगी भाजपप्रवेश करून निवडणूक लढविण्याची नाहटा यांची तयारी होती. म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे नाईक आणि नाहटा यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे येथील सामना आता एकतर्फी होणार अशी चिन्हे आहेत.

आघाडीचे उमेदवार म्हणून

राष्ट्रवादीने नगरसेवक अशोक गावडे यांना मैदानात उतरविले आहे. त्यांनी अर्ज भरला आहे, मात्र पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज जोडला नाही. त्यात म्हात्रे, नाईकांच्या तुलनेत हे नाव अगदीच अपरिचित आहे. नाईकांना शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्य़ात शह देण्यासाठी भाजपने स्वीकारले आहे. नाईकांची उमेदवारी कापल्याने त्यांनी मुलाच्या मतदारसंघाचा आधार घेतला आहे. त्यामुळे त्यांना ऐरोलीसह जिल्हय़ातील मतदारसंघात प्रचार करून स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. ताईंना निवडून आणण्याची जबाबदारीही नाईकांची आहे.

आमदारांची कामे

  •  सिडकोनिर्मित घरांसाठी वाढीव एफएसआय
  • प्रकल्पग्रस्तांच्या घरे अनधिकृतऐवजी अनियमित
  •  प्रकल्पग्रस्त संचालकांच्या शाळांचे भूखंड नियमित
  •  आरोग्य यंत्रणा विकसित करण्यासाठी महत्त्वाचे साहित्य
  • स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मोक्याच्या ठिकाणी शौचालये
  •  बेलापूर किल्ल्याच्या संवर्धन करण्यासाठी निधी वापर
  •  मुंबई नवी मुंबई जलवाहतुकीसाठी प्रयत्नशील, सर्व गावात जेट्टी

समस्या

  •  प्रकल्पग्रस्तांची अनधिकृत बांधकामे अद्याप नियमित नाहीत. प्रकल्पग्रस्तांवर टांगती तलवार
  •  मतदार संघातील पार्किंग समस्या गंभीर
  • धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित
  • झोपडपट्टी पुनर्वसन आणि ग्रामीण विकास

मतदार म्हणतात

पार्किंग समस्या या मतदारसंघासाठी डोकेदुखी ठरत आहे. सहज आणि मोफत वाहनतळ नाहीत.फेरीवाला परवाने देऊन त्यांना एकाच जागी व्यवसाय करण्यास देणे आवश्यक आहे. बेलापूर डोंगराचा चांगला विकास करता येण्यासारखा आहे.-अशोक मुळये, आर्टिस्ट व्हिलेज, सीबीडी

वाशी हे झपाटय़ाने वाढणारे

उपनगर आहे. येथील पार्किंग आणि फेरीवाले या समस्या त्रासदायक आहेत. मार्जिनल स्पेस व्यापाऱ्यांनी काबीज केली आहे. अलीकडे वाहतूक कोंडी वाढली आहे. सार्वजनिक तरण तलावाचा गरज आहे. – सुनील कदम, रहिवाशी, सेक्टर १७ वाशी

झोपडपट्टीचा विकास

करण्याचा येथील राज्यकर्ते कधी विचारच करीत नाहीत. मुंबईत झोपडपट्टायचे पुनर्वसन होऊन तेथील रहिवाशांची जीवनशैली सुधारत आहे. आमचे कधी स्वप्न पूर्ण होणार – विष्णू मेटकर, तुर्भे स्टोअर

गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात महत्त्वाची कामे झालेली आहेत. दोनशे कोटी रुपयांचा निधी विविध मार्गाने उपलब्ध करण्यात आला आहे. बेलापूर किल्ल्याचे संवर्धन, बेलापूरमधील दोन जेट्टी, शौचालये, वैद्यकीय साहित्य देण्यात आले आहे. एफएसआयचा प्रश्न भाजपने सोडविलेला आहे. पालिकेच्या क्षेपणभूमीचे शंभर कोटी रुपये माफ केले आहेत. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटणार आहे. देशात आणि राज्यात भाजप सरकार असल्याने हा प्रश्न प्रलिबत राहणार नाही.-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

येथील ग्रामस्थांचे प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. वाहनतळ, फेरीवाले, यांसारख्या नागरी प्रश्नांबरोबरच झोपडपट्टी पुनर्वसन, शहरी पुनर्विकासाची एकही वीट रचली गेलेली नाही. पायाभूत सुविधा तर आहेत पण नागरिकांच्या बौद्धिक वाढीसाठी कॉस्पोपॉलिटन लायब्ररी, कल्चरल सेटंर, आणि मुलांवर संस्कार करणारे बालभवन अशा नवीन संकल्पना राबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करणे आवश्यक आहे.- विजय नाहटा, सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार समिती,