एकीकडे सत्तास्थापनेचा पेच सुप्रीम कोर्टात पोहोचलेला असताना राष्ट्रवादीने नवा डाव खेळायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीने चक्क आपल्याला पक्षातील ५१ आमदारांचा पाठिंबा असल्याची लिस्टच राजभवनाला सोपली आहे. विशेष म्हणजे, या यादीत खुद्द अजित पवार यांचे नाव आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्हते. मात्र, राष्ट्रवादीने ही यादी राजभवनाला सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी राजभवन गाठले. ५१ आमदारांची यादी त्यांच्याकडे होती. त्यात अजित पवारांचेही नाव होते. पण, त्यावर अजित पवार यांची स्वाक्षरी नव्हती, असे समजते. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ५१ आमदार आमच्यासोबत आहेत. आता अजित पवार यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अजित पवार यांची भेटही घेतली जात आहे.

 

या खेळीतून राष्ट्रवादीने काय साधले, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. याद्वारे राष्ट्रवादीला भाजपाला तोंडघशी पाडायचे आहे का? की, भाजपाने सादर केलेलीसमर्थनाची यादी बनावट आहे, असे राष्ट्रवादीला सिद्ध करायचे आहे? असे प्रश्न राजकीय तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

राष्ट्रवादीची आज दुपारी पुन्हा बैठक होणार
काही आमदार अजून यायचे आहेत. त्यांना घेऊन पुन्हा एकदा आज (रविवार) दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.