दुहेरी विकासासाठी पुन्हा सत्ता देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी मुंबई : आधुनिक भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राचे महायोगदान राहणार आहे. त्यामुळे दिल्लीत नरेंद्रला जशी पुन्हा सत्ता दिलीत त्याच ताकदीने राज्यात देवेंद्रला पुन्हा सत्ता द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथे केले. दिल्लीत नरेंद्र तर मुंबईत देवेंद्र हे सूत्र पाच वर्षांत यशस्वी झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

पाच वर्षांत हेच सूत्र राज्याला विकासाच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी खारघर येथे आले होते. भाषणाची सुरुवात मराठीत करून मोदी यांनी एका वर्षांत भगवान परशुराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य भूमीत दोनदा येण्याची संधी मिळाल्याने कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे स्पष्ट केले.   नवी मुंबई विमानतळ, न्हावा शेवा- शिवडी सागरी सेतू, मेट्रो, यामुळे कोकण क्षेत्र हे एक आर्थिक विकासाचे नवीन केंद्र तयार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योग व्यवसाय निर्माण होणार असून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिक ग्राहक आणि शेतकऱ्यांना फसवीत होते. त्यासाठी राज्य सरकारने महारेरा आणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची दुकाने बंद केलेली आहेत असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

मतदानाला प्राधान्य द्या : मतदानाच्या दोन दिवस अगोदर दोन सुट्टय़ा आहेत. ते पाहून सहलीचा बेत आखला असेल तर तो रद्द करा आणि मतदानाला प्राधान्य द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. भाषणाची सुरुवात मराठीतून करून त्याचा शेवटही मराठीत करताना पुन्हा आणू या आपले सरकार हे मराठीतील घोषवाक्य मोदी यांनी उपस्थितांकडून वदवून घेतले.