युतीबरोबरच काँग्रेस आघाडीपुढेही चिंता

नागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भात एकूण ६२ पैकी २२ मतदारसंघांत विविध पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड केले आहे. यात प्रामुख्याने भाजप व सेनेच्या उमेदवारांचा समावेश अधिक आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसलाही याचा फटका बसला आहे.

यवतमाळमध्ये भाजपचे विद्यमान मंत्री मदन येरावार यांच्या विरुद्ध सेनेचे संतोष ढवळे यांनी बंड केले आहे. तसेच दिग्रस मतदारसंघात सेनेचे विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्या विरुद्ध भाजप नेते संजय देशमुख रिंगणात उतरले आहेथ. आर्णीमध्ये राजू तोडसाम तर तुमसरमध्ये चरण वाघमारे या दोन विद्यमान आमदारांनी बंड केले आहे. भंडारा जिल्ह्य़ात काँग्रेस नेते नाना पटोले (साकोली) यांच्याविरुद्ध काँग्रेसचेच माजी आमदार सेवक वाघाये यांनी वंचितची उमेदवारी घेऊन नाना यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.

सेनेच्या प्रमुख बंडखोरांमध्ये  माजी आमदार अनुक्रमे आशीष जयस्वाल यांनी भाजपचेआमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरुद्ध रामटेकमध्ये, सेनेचेच माजी आमदार अशोक शिंदे यांनी हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्याविरुद्ध बंड केले आहे. बुलढाण्यात सेनेचे संजय गायकवाड यांच्याविरुद्ध भाजपचे योगेंद्र गोडे रिंगणात आहेत.

भाजपचे सर्वाधिक बंडखोर

विदर्भात एकूण ६२ जागा आहेत. यापैकी आठ मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांनी, सात मतदारसंघांत सेनेच्या उमेदवारांनी बंड केले आहे. काँग्रेस चार व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दोन मतदारसंघांत बंडखोरी केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपात गेलेले भंडाऱ्याचे गोपाल अग्रवाल यांच्याविरुद्ध भाजप नेते विनोद अग्रवाल रिंगणात आहेत. ते मागच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. भंडारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी तिरोडय़ातून बंड केले आहे.