छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचा विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (बसपाने) छिंदमला अहमदनगर शहर या मतदारमधून निवडणुकीचे तिकीट दिले होते. मात्र या मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप पुन्हा निवडून आले आहेत. तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये शिसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

२०१८ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला त्याचं पद गमवावं लागलं होतं. तसंच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं होतं. या सगळ्या गोष्टी घडूनही डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदगनर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छिंदम अपक्ष म्हणून लढला. विशेष म्हणजे छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून एक हजार ९७० मतांनी अपक्ष म्हणून निवडूनही आला. त्यामुळे आता त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला. मात्र त्याला विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ २ हजार ९२३ मते मिळाली आहेत. त्यामुळेच त्याचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या जगताप यांना एकूण ८१ हजार २३१ मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या राठोड यांना ७० हजार ७८ मते मिळाली आहेत. जगताप यांनी ११ हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपाला मोठा धक्का देत १२ पैकी सात जागांवर विजय मिळवला आहे.

छिंदमची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये छिंदम नगरच्या उपमहापौरपदी असताना ठेकेदाराशी उर्मट भाषेत बोलत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही त्याने अपशब्द काढले. ज्यामुळे भाजपावर टीकेचे ताशेरे झाडण्यात आले. त्यानंतर भाजपाने त्याला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर छिंदमला उपरती आल्याने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण त्यांच्यासमोर नतमस्तक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे व राज्याचे आराध्यदैवत असून त्यांच्यासमोर मी नतमस्तक होऊन हा विजय स्वीकारला असल्याचे त्याने माध्यमांसमोर सांगितले होते.