“मॉब लिंचिंग ही पद्धत भारतीय नाही,” असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला होता. भागवत यांच्या दाव्याला एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिलं आहे. “मोहन भागवत यांना माहिती पाहिजे की भारतात मॉब लिचिंग होतं. दिल्लीतल्या रस्त्यावर हजारो शिखांना मारण्यात आलं. अजून त्यांना न्याय मिळालेला नाही. ते मॉब लिंचिंग नव्हत का,” असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

मॉब लिचिंग हा विदेशी धर्मग्रंथातून हा शब्द आला आहे. हा शब्द भारतात कसा रूढ झाला, हे शोधण्याची गरज आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्येसाठी ‘लिंचिंग’  या शब्दाचा वापर करण्यामागे षड्यंत्र आहे. हिंदू समाजाला बदनाम करून अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते.

मोहन भागवत यांच्या विधानाचा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी परभणी येथे झालेल्या प्रचार सभेत समाचार घेतला. ओवेसी म्हणाले,”आरएसएसचे मोहन भागवत म्हणतात, मॉब लिंचिंग भारतात होत नाही. बाहेरील देशांशी याचा संबंध आहे. मोहन भागवत यांनी माहिती करून घेतले पाहिजे की भारतात मॉब लिंचिंग होत. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीतल्या रस्त्यांवर हजारो शिखांना मारण्यात आलं. मारणारे मुसलमान होते का? जे शिख चालत होते, त्यांना गळ्यात पेटलेले टायर टाकून मारण्यात आलं. आरएसएसच्या लोकांनो, ते मॉब लिंचिंग नव्हतं का? ते कुणी केलं ते तुम्हाला माहित आहे. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही,” असं ओवेसी म्हणाले.

२००२ मध्ये गुजरात झालं. एक मुलगी जी आपल्या गावातून पळून जात होती. तिच्या सोबत दोन वर्षांची मुलगी होती. तिच्या घरातील आठ-नऊ लोकांची हत्या करण्यात आली. त्या मुलीवर  १२-१३ लोकांनी अत्याचार करण्यात आला. नंतर तिच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली. २००२ मध्ये ही घटना झाली. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तिला ५० लाख रूपये द्या. सरकारी नोकरी द्या. हे करणारे कोण होते. हे मॉब लिंचिंग नव्हतं का? मोहन भागवत म्हणतात, अर्थव्यवस्था चांगली आहे. मग तरुणांना नोकऱ्या का मिळत नाही. नोकरी नसल्याने तरुणांना मॉब लिंचिंगमध्ये लावून दिलं,” असा आरोपही ओवेसी यांनी केला.