धवल कुलकर्णी 

“जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आपली युती होऊ शकते हे समजलं तेव्हा छातीत लोखंडाची सळई घुसल्यासारख्या वेदना झाल्या… माझ्यावर आज खूप पोलीस केसेस आहेत. त्याचे कारण एकच, मी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांच्या विरोधात लढलो. आपण लाचारी करून या लोकांसोबत सत्ता मिळवायची? शिवसैनिक हा गरीब असला तरी लाचार आणि विकाऊ नाही, तो स्वाभिमानी आहे”

“महाराष्ट्रातली जनता हा दिवस कधीही विसरणार नाही. ज्यादिवशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी असेल तो आमचा शिवसैनिक म्हणून पक्षातला शेवटचा दिवस असेल…”

या आणि अशाच काही उद्विग्न प्रतिक्रिया आहेत काही “कट्टर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या.” शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करू पाहत असली तरीसुद्धा ही आघाडी वाटते तितकी सोपी नाही.

शिवसेनेचे कॅरेक्टर हे एका आक्रमक विरोधी पक्षाचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ ते २०१४ या कालखंडामध्ये सत्तेत असताना, शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली, सरकारला टोकाचा विरोधही केला. त्यादरम्यान या शिवसैनिकांनी पोलिसांचा मार खाल्ला, अंगावर केसेस घेतल्या व अनेक यातना सोसल्या. आता, भाजपाला दूर ठेवण्यासाठी का होईना, पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करून सत्ता काबीज करण्याचा विचार हा या पिढीला अस्वस्थ करतो आहे.

धुळ्याच्या एका कट्टर शिवसैनिकाने तर मंत्रालयावर भगवा फडकत नाही तोपर्यंत आणि  शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव होत नाही तोपर्यंत पायात चप्पल सुद्धा न घालण्याचा पण केला होता. अनेकदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीतल्या बिघाडी चा फायदा दोन बोके एक माकडाच्या कथेतल्या माकडा प्रमाणे शिवसेना घ्यायची.

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये थेट संघर्ष आहे तो शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा. शिवसेनेने विधानसभेचे मध्ये लढलेल्या १२४ जागांपैकी त्यांना ५७ ठिकाणी संघर्ष करावा लागला तो थेट शरद पवारांच्या पक्षांसोबत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ला युती करायची होती. पण शेवटी या विचाराला तिलांजली द्यावी लागली ती याच वास्तवामुळे.

अजून एक लक्षणीय गोष्ट अशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या पाच खासदारांपैकी (त्यात एका पक्षाने पुरस्कृत केलेल्या अपक्षांचा समावेश आहे) चार जण, सुनील तटकरे (रायगड), उदयनराजे भोसले (सातारा), डॉक्टर अमोल कोल्हे (शिरूर) व अपक्ष नवनीत कौर रवी राणा (अमरावती) हे शिवसेनेच्या विद्यमान खासदाराच्या किंवा उमेदवाराच्या विरोधात निवडून आले होते. (उदयनराजेंनी नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून साताऱ्याहून लोकसभेची पोटनिवडणूक अयशस्वीरित्या लढवली.)

यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष हा किती टोकदार आहे त्याचे स्थानिक परिमाण नेमके कोणते हे लक्षात येईल.

सामाजिक दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की शिवसेनेचा सामाजिक व राजकीय पाया हा प्रचंड विस्तृत असला, तरी पक्षाचा कणा म्हणजे इतर व इतर मागासवर्गीय व मराठा व बहुजन समाजातले काही दुर्लक्षित घटक. या वर्गाचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठीराखे असणाऱ्या सरंजामशाही वर्गाशी स्थानिक पातळीवर प्रचंड संघर्ष सुरू असतो.

यातील काही नेत्यांनी तात्कालिक राजकीय फायद्यासाठी आपापल्या पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला असला तरीसुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना या वर्गाकडून असणारा पाठिंबा हा राष्ट्रवादीला मिळणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र सारख्या भागात मिळालेल्या यशातून अधोरेखित होतो.

अर्थात, या विचाराला व संघर्षाला काही अपवाद आहेत. शिवसैनिकांमध्ये एका गटाला आपला पूर्वाश्रमीचा धाकटा भाऊ असलेला भाजपा हा आपल्यावर वरचढ झाला आहे याचा प्रचंड राग आहे. हे शिवसैनिक असा आरोप करतात ही गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने आपली बरीच शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीचा मुकाबला करण्यापेक्षा शिवसेनेला खच्ची करण्यात खर्ची केली. याचं कारण उघड आहे. भाजपाचा सामाजिक पाया हा शिवसेना इतका विस्तारलेला नाही त्यामुळे पक्षाला एका मर्यादेच्या पलीकडे जर महाराष्ट्रात वाढायचं असेल तर त्याला कुठेतरी शिवसेनेच्या मागे असणारा वर्ग हा स्वतःकडे खेचून घ्यावाच लागेल. दुसरं म्हणजे, भारतातील अन्य कुठल्याही राज्यांमध्ये हिंदुत्वाच्या विषयावर भूमिका घेणारे दोन मोठे पक्ष नाहीत. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप हे दोन मित्र पक्ष एका हिंदुत्ववादी विचाराच्या मंडळींना स्वतःकडे आकृष्ट करायला पाहतात. यातून संघर्ष होणं ते अनिवार्य आहे.

त्याच्यामुळे, “शत्रूचा शत्रू हा आपला मित्र” व “गरज ही शोधाची जननी आहे,” या सनातन न्यायाने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत घरोबा करावा व मिळालेल्या सत्तेचा वापर हा स्थानिक सत्ता केंद्रावर ताबा मिळवण्यासाठी व पक्षाची मुळे उर्वरित महाराष्ट्रात, जिथे भाजप सोबत झालेल्या युतीमुळे शिवसेनेच्या वाढीवर काही नैसर्गिक बंधने आली होती, तिथे रुजवण्यासाठी करावा असे या शिवसैनिकांना वाटते.