निवडणूक सुरु झाली आहे, काही दिवसांवर मतदान आलं आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाहीए, कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पायपोस एकमेकांच्या पायात नाहीत. त्यामुळे ते पहिल्यापासूनच पराजयाच्या मानसिकतेच गेले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. धुळे ग्रामीणमधील नेर येथे ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, कालपरवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात त्यांनी जगातली सर्व आश्वासने देऊन टाकली फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासनं देणं बाकी राहिलंय. कारण आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे त्यांचे धोरण आहे. पन्नास वर्षे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं राजकारण यांनी केलं. जनतेचा नव्हे तर स्वतःचा फायदा करुन घेतला. गेल्या पाच वर्षात हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही चोवीस तास जनतेकरीता काम केलं. जनतेचा पैसा जनतेकडे नेला.

पंधरा वर्षांत ज्या राज्यातला शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला होता, अशा महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटीची मदत केली. मात्र, पाच वर्षात युतीच्या सरकारने केलेली मदत ही ५० हजार कोटींची होती. आम्ही राज्यात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती अजूनही सुरुच आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्याला वर्षाला बाराशे कोटी रुपये दिले जात होते आम्ही १० हजार कोटी रुपये दिले. जलयुक्तशिवार योजनेतून जवळजवळ १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना शेततळी दिली, दीड लाख शेतकऱ्यांना विहीरी दिल्या, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

जुन्या काळात धुळे जिल्हा एक व्यापारी केंद्र होतं पण दुर्देवानं रस्त्यांचं आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा तयार न झाल्याने या ठिकाणी उद्योग आले नाहीत, त्यामुळे इथला व्यापार संपला. त्यामुळे आपल्याला कठीण परिस्थितीतून जावे लागले. म्हणून मोदींनी दिल्ली-मुंबई कॉरिडॉर तयार केला त्याचा निधी आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमांतून इथे मोठे उद्योग येणार आहेत. नॅशनल हायवेचं काम सुरु आहे, मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टरचं काम झाल्याने ते थांबलं होतं पण आता ते पुन्हा सुरु झालं आहे. आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजेतून ३० हजार किमी काम केलं देशात कुठल्याच राज्यात हे झालं नाही. १८ हजार गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण पोहोचवल्या, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, आपण बघितलं या महाराष्ट्राची देशाची जगात काय शान आहे. काल परवा मोदी अमेरिकेत गेले होते. यापूर्वी आपले पंतप्रधान अमेरिकेत जायचे तर त्यांना तिथला मंत्री देखील विचारत नव्हता. मात्र, मोदींच्या भाषणाला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हजर होते आणि दीड तास प्रेक्षकांमध्ये बसून मोदींचं भाषण ऐकलं त्यांचा हात हातात घेऊन त्यांनी सांगितलं की, मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत तर ते विश्वनेते आहेत.

या भारतात प्रत्येकाच्या मनात शल्य होतं की काश्मीर आमचं होतं पण त्याला वेगळा दर्जा होता. त्याला तिरंग्यापेक्षा वेगळ्या झेंडाला मान होता. त्या ठिकाणी ३७० मुळे काश्मीरमधला व्यक्ती म्हणायचा आम्ही वेगळे आहोत आम्ही भारतीय नाही. त्याठिकाणी वेगळेपणाची भावना तयार झाली होती. पाकिस्तान काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करीत होता मात्र, मोदींना तुम्ही तीनशेच्या वर जागा दिल्या आणि त्यांनी ३७० कलम रद्द करुन टाकलं आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला. मोदींनी हे करुन दाखवलं, त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात शक्तीशाली भारत तयार होत आहे. मोदींच्या नेतृत्वात एक शक्तीशाली आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला करायचाय.