राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता सुटणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली असून यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील माध्यमांशी बोलताना सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकावं यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे. जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने आणि भक्कम पायावर उभं राहिलं, तर सरकार पाच काय पंधरा वर्षे देखील टिकेल, असं म्हटलं आहे.

”सरकारस्थापनेबाबत चर्चा बरीच पुढं गेलेली आहे. आमच्या मित्र पक्षांना उद्या आम्ही मुंबईत बोलावत आहोत. त्यांच्याशी उद्या १२ वाजता आम्ही भेटणार आहोत. त्यानंतरच पुढची आवश्यक पावलं तातडीने पडतील असं मला वाटतं. मित्र पक्षांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही ज्यांच्याबरोबर सरकार स्थापनेसाठी चर्चा करतो आहोत, त्यांच्याबरोबर पुढे जाणार आहोत. सरकार पाच वर्षे टिकावं यासाठीच एवढी चर्चा सुरू आहे. जे ठरेल ते पूर्ण विश्वासाने आणि भक्कम पायावर उभं राहिलं, तर सरकार पाच काय पंधरा वर्षे देखील टिकेल. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे व शिवसेना हा नवा पक्ष आमच्याबरोबर जोडला जातो आहे. त्यामुळे समन्वयाची आवश्यकता आहे.” असं जयंत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

“महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुदुद्यांवर चर्चा पूर्ण झाली असून एकमत झालं आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता आहे. उद्या आम्ही मुंबईला जाणार असून तिथे निवडणुकीच्या आधी आघाडीसोबत होते त्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. त्यांना आमच्यात झालेल्या चर्चेची माहिती देणार आहोत,” अशी माहिती देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती.